‘वंदे मातरम्’ म्हणणे अत्यंत गरजेचे: मंत्री ना. नितेश राणे
सिंधुदुर्ग / राजू तावडे
देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाबद्दल, राष्ट्राच्या ध्वजाबद्दल आणि संस्कृतीबद्दल सार्थ अभिमान आहे. देशात राहणाऱ्या प्रत्येकाने ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणणे अत्यंत गरजेचे आहे. देशात राहूनही जे ‘वंदे मातरम्’ म्हणायला नकार देतात, त्यांचे या देशावर प्रेम नाही. मदरसासारख्या ज्या संस्था ‘वंदे मातरम्’ म्हणत नाहीत, अशा संस्थांची नोंदणी तात्काळ रद्द करण्यात यावी ही आपली ठाम भूमिका आहे. आमच्यासाठी आमचा देश आणि राष्ट्रहित हेच सर्वोतपरी आहे. आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नंतर आहोत, मात्र प्रथम या देशाचे निष्ठावंत नागरिक आहोत. आमच्या तिरंग्यावर आमचे अनन्यसाधारण प्रेम आहे. असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.
सावंतवाडी येथे आयोजित भव्य तिरंगा रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी देशप्रेमाचे महत्त्व अधोरेखित केले. श्री. राणे म्हणाले, जो कोणी या मातृभूमीला आपली आई मानतो आणि ज्याच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे, तो प्रत्येक नागरिक आज या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाला आहे. जे ‘भारत माता की जय’ म्हणायला विरोध करतात, त्यांना पाकिस्तानमध्ये पाठविण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. त्यामुळे आपल्या देशाबद्दल आणि राष्ट्राभिमानाबद्दल प्रत्येकाने कडवट व प्रखर भूमिका घेणे हि काळाची गरज आहे. तिरंगा ही आमची शान आहे आणि आमचे रक्त भगवे आहे. याच भावनेतून आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत, असे सांगत ना. नितेश राणे यांनी राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.
यावेळी आमदार दीपक केसरकर, तिरंगा रॅली प्रमुख संदीप गावडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सावंतवाडी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा युवा नेते विशाल परब, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, विद्याधर परब, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, सुदन कवठणकर, मायकल डिसोजा, तसेच जिल्हा बँक संचालक महेश सारंग, विद्याधर परब, माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, जावेद खतीब, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरपरिषद सभापती सुधीर आडीवरेकर व महिला शहराध्यक्ष सौ. मोहिनी मडगावकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सावंतवाडीतील उपरलकर देवस्थान येथून शुभारंभ झालेल्या या या भव्य तिरंगा यात्रेत माजी सैनिक, नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध गावांचे सरपंच तसेच भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे सर्व स्तरांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते देशप्रेमाच्या घोषणा देत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण सावंतवाडी शहर या यात्रेमुळे देशभक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.


