तळवडेत इस्त्री दुकान जळून खाक
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील विजय सोनू कुंभार यांच्या ‘सायली इस्त्री सेंटर’ या दुकानाला रविवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दुकानाचे मालक विजय कुंभार यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला .या दुर्घटनेत सुमारे ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गणपती उत्सवासाठी माल खरेदी करण्यासाठी जमवून ठेवलेली सुमारे २ लाख रुपयांची रोकडही आगीत जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले.
विजय कुंभार हे अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत इस्त्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पत्नीच्या आजारपणासह अनेक संकटांचा सामना करत त्यांनी हा व्यवसाय उभा केला होता. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधनच उद्ध्वस्त झाले आहे.


