मोबाईल हा मुलांच्या हातातील राक्षस; पत्रकार सीताराम गावडे
सिंधुदुर्ग / राजू तावडे
आजच्या डिजिटल युगात मोबाईल हे संपर्काचे प्रभावी साधन असले तरी लहान मुलांच्या हातात आलेला मोबाईल त्यांच्या भवितव्यासाठी धोकादायक ठरू शकतो. “मोबाईल हा मुलांच्या हातात मिळालेला राक्षस आहे. या राक्षसाच्या आहारी गेल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मुलांनी शक्यतो वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मोबाईलचा वापर टाळावा,” असे मत सकल मराठा समाज व सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माजी नगरसेवक गुरुदास मठकर यांनी सावंतवाडी येथील पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४ मध्ये आयोजित केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात गावडे बोलत होते.
यावेळी गावडे यांनी मोबाईलच्या अतिवापराबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना अत्यंत परखड शब्दांत इशारा दिला. “एक-दोन वर्षांच्या मुलांच्या हातातही मोबाईल देण्याची सवय आज अनेक पालकांमध्ये दिसत आहे. ही सवय अत्यंत घातक आहे. सुरुवातीला मुलाला शांत करण्यासाठी दिलेला मोबाईल पुढे त्याच्या सवयीचा आणि व्यसनाचा भाग बनतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.मोबाईलवरील रील्स, गेम्स आणि सोशल मीडिया यांच्या अतिवापरामुळे मुलांचा अभ्यास, एकाग्रता आणि प्रत्यक्ष सामाजिक संवाद यावर परिणाम होऊ शकतो. ही परिस्थिती पालकांनी वेळीच ओळखायला पाहिजे. पालकांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे गावडे यांनी सांगितले. पालक जे करतात तेच मुले अनुकरण करतात. त्यामुळे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचे असेल तर सुरुवात घरातील मोठ्यांनीच केली पाहिजे,” असे ते म्हणाले.
यावेळी गावडे यांनी माजी नगरसेवक गुरुदास मटकर यांच्या पुढाकारातून आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचेही कौतुक केले. “संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. यापूर्वी आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्तही त्यांनी शंभर सायकलींचे वाटप केले होते. समाजासाठी काहीतरी देण्याची दानशूर वृत्ती त्यांच्यात पहिल्यापासून आहे. अशी माणसे समाजात कमी असतात,” असे गावडे यांनी नमूद केले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, नगरसेविका सीमा नाईक, सुनील नाईक, नीता विर्नोडकर आदी उपस्थित होते.


