ब्लॉकमध्ये साचलेल्या पाण्यात डासांच्या अळ्यांचा धोका… उपाययोजना करा… शेखर सुभेदार
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी, ता. २२ : पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांचा धोका वाढत असताना शहरातील पाणी साचणाऱ्या प्रत्येक ठिकाणाची नियमित तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. नारळाच्या करवंट्या, माकडांनी खाल्लेल्या शहाळ्यांच्या करवंट्या किंवा इतर टाकाऊ वस्तूंमध्ये पाणी साचू नये, यासाठी नागरिकांना सूचना दिल्या जातात. मात्र, सार्वजनिक ठिकाणी बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या ब्लॉकमध्येच पाणी साचून डासांच्या अळ्यांची उत्पत्ती होत असेल, तर त्यावर नगरपरिषद प्रशासन काय उपाययोजना करणार? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते शेखर सुभेदार यांनी उपस्थित केला आहे.
सावंताडी शहरातील काही प्रभागात गटार बंदिस्त करण्यासाठी फरशा वापरण्यात आल्या आहेत. फरशीमध्ये बसविण्यात आलेल्या ब्लॉकच्या गोलाकार भागात पाणी साचत आहे. काही ठिकाणी पाणी काळवंडलेले असून, त्यामध्ये डासांच्या अळ्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः पावसाळ्यात अशा लहान आकाराच्या खड्ड्यांमध्ये किंवा पाण्याचा निचरा न होणाऱ्या भागात पाणी दीर्घकाळ साचल्यास ते डासांच्या उत्पत्तीचे ठिकाण बनू शकते.
महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक माहितीनुसार डासांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे, पाणी साचू न देणे आणि आवश्यकतेनुसार अळीनाशक उपाययोजना करणे हे डास नियंत्रणातील महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. घरांच्या परिसरात पडलेल्या करवंट्या, टायर, कुंड्या किंवा इतर वस्तूंमध्ये पाणी साचल्यास त्या हटविण्याचे आवाहन नागरिकांना केले जाते. मात्र, नागरिकांनी स्वच्छता राखणे जितके आवश्यक आहे, तितकीच सार्वजनिक मालमत्ता आणि नगरपरिषद क्षेत्रातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करणे ही प्रशासनाचीही जबाबदारी आहे.
ब्लॉकमध्ये पाणी साचत असल्याने अशा ठिकाणी नियमित पाहणी होते का? डासांच्या अळ्या आढळल्यास त्या नष्ट करण्यासाठी काय उपाय केले जातात? पाण्याचा निचरा होण्यासाठी या ब्लॉकच्या रचनेत बदल करता येईल का? तसेच अशा प्रकारच्या इतर ब्लॉकची शहरभर तपासणी केली जाणार का, असे प्रश्न श्री. सुभेदार यांनी केले आहेत.
केवळ धूरफवारणी नव्हे, उत्पत्तीस्थळ नष्ट करण्याची गरज
डासांची संख्या वाढल्यानंतर धूरफवारणी करण्यापेक्षा डासांची उत्पत्तीस्थळे शोधून ती नष्ट करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने शहरातील केवळ घरगुती परिसराची नव्हे, तर रस्ते, सार्वजनिक जागा, फरशी, ब्लॉक, गटारे, बांधकाम साहित्य आणि पाणी साचणाऱ्या प्रत्येक संभाव्य ठिकाणाची पाहणी करणे गरजेचे आहे.
_______


