तुमचा भाऊ म्हणून सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी सदैव तुमच्या सोबत राहण्याचा मी प्रयत्न करेन…. विशाल परब
सिंधुदुर्ग / राजू तावडे
राखीचा धागा मनगटावर बांधला जातो; मात्र त्यामागची आपुलकी थेट हृदयाला जोडली जाते. मतदारसंघातील भगिनी माझ्यासाठी केवळ मतदार नसून माझ्या कुटुंबाचा एक भाग आहेत. तुमच्या प्रेमाने मन भरून आले असून, तुमचा भाऊ म्हणून सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी सदैव तुमच्या सोबत राहण्याचा मी प्रयत्न करेन,” असा भावनिक शब्दांत भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी भगिनींशी संवाद साधला.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आपल्या ‘लाडक्या भगिनींशी’ असलेला स्नेह आणि विश्वासाचा ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी विशाल परब यांच्या वतीने माजगाव नाका येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला मतदारसंघातील हजारो भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विशाल परब यांना राखी बांधून उदंड आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
सार्वजनिक जीवन आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाती जपण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात राजकीय औपचारिकतेपेक्षा भाऊ-बहिणीच्या नात्यातील आपुलकी आणि ऊब प्रकर्षाने दिसून आली. रक्षाबंधन म्हणजे केवळ सण नसून काळजी, आधार आणि आयुष्यभर पाठीशी उभे राहण्याचे वचन आहे, याच भावनेने हा कार्यक्रम पार पडला.


