कुडाळ जवळ अंबर ग्रीस वाहतूक…चौघे ताब्यात
सिंधुदुर्ग / राजू तावडे
व्हेल माशाच्या उलटीपासून (अंबरग्रीस) तयार होणाऱ्या पदार्थाची तस्करी करण्याच्या उद्देशाने तो विक्रीसाठी घेऊन आलेल्या चौघांना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी पणदूर-कुडाळ मार्गावर सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ किलो ३०३ ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले. त्याची किंमत तब्बल २ कोटी ३७ लाख ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. दोन वाहनांसह या कारवाईत पोलिसांनी एकूण २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शनिवारी सायंकाळी पेट्रोलिंग करीत असताना अंबरग्रीसची तस्करी होणार असल्याची विश्वसनीय माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. पंच, वजनकाटाधारक तसेच वनरक्षक यांच्या उपस्थितीत पणदूर ते कुडाळ जाणाऱ्या डांबरी रस्त्यालगत कुलस्वामिनी एंटरप्रायझेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या कार्यालयाशेजारी सापळा रचण्यात आला.
यावेळी काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (एमएच ०७ एएन ६२९४) आणि ग्रे रंगाची मारुती सुझुकी एर्टिगा (एमएच ०७ एएस ३७४७) या वाहनांमधून आलेल्या चौघांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता विक्रीच्या उद्देशाने ताब्यात ठेवलेले अंबरग्रीस आढळून आले.


