दहा वर्षांत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले : अध्यक्ष अन्वर खान
सिंधुदुर्ग / राजू तावडे
आपल्या संस्थेला दहा वर्षे पूर्ण झाली असून, गेल्या दहा वर्षांत संस्थेने बांदा व पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम व उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. यामध्ये आरोग्य शिबिरे, मार्गदर्शन व्याख्याने, ज्येष्ठ नागरिकांची ओळखपत्रे तसेच १८७ जणांना एनसीएमसी (NCMC) कार्ड उपलब्ध करून दिल्याची माहिती ‘ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी’ संस्थेचे अध्यक्ष अन्वर खान यांनी दिली. बांदा ग्रामपंचायत सभागृहात रविवारी आयोजित संस्थेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते.
सभेची सुरुवात संस्थेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष महादेव वसकर व श्रीमती अनुराधा मोर्ये, सचिव गुरुनाथ नार्वेकर, सहसचिव उत्तम देसाई, खजिनदार जगन्नाथ सातोसकर, तसेच सदस्य नरेंद्र सारंग, भिकाजी धुरी, अर्चना सावंत, सुभाष नाईक व अशोक परब उपस्थित होते.
अध्यक्ष अन्वर खान पुढे म्हणाले की, ” या कार्यकारिणीची ही शेवटची वार्षिक सभा असून, मुदत संपत असल्याने नोव्हेंबर २०२६ मध्ये नवीन कार्यकारिणी निवडण्यात येईल. कार्यकारिणीतील सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच मी माझ्या कार्यकाळात चांगले कार्य करू शकलो.” संपूर्ण जिल्ह्यात बांदा ज्येष्ठ नागरिक संघटना ही अतिशय उत्कृष्ट उपक्रम राबवणारी संस्था म्हणून ओळखली जात आहे. याचे श्रेय सर्व सदस्यांनाच आहे.
गेल्या आर्थिक वर्षात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, ७५ वर्षांवरील ज्येष्ठांचा सन्मान, वर्षा सहल, ‘वय वंदन कार्ड’ योजना, शालेय निबंध स्पर्धा, दीपोत्सवात आकाशकंदील स्पर्धा, मुलांसाठी पर्यावरणपूरक किल्ला स्पर्धा, शिवजयंती, जत्रोत्सव व देवदर्शन असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. १८ जानेवारी २०२६ रोजी संस्थेच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या ‘आनंद सोहळ्या’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
सभेत सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला, जमा-खर्च पत्रकाचे वाचन केले आणि पुढील वर्षाच्या नियोजनाची माहिती सभागृहाला दिली.
मंचाचे ज्येष्ठ सदस्य शंकर मंगेश नार्वेकर यांनी संकलित केलेल्या ‘संतांचे अभंग’ या हस्तलिखिताचे प्रकाशन अध्यक्ष अन्वर खान यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. श्री. प्रकाश पाणदरे यांनी आगामी किल्ला स्पर्धेसाठी ५,००० रुपयांची देणगी जाहीर केली. मंचाच्या सर्व सदस्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकावर न चुकता अविरत लिहिणारे कोषाध्यक्ष जगन्नाथ सातोसकर यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.
या सभेतील चर्चेत एम. डी. मोरबाळे, सुकाजी गावडे, हरिश्चंद्र भिसे, राजू तावडे, साईप्रसाद कल्याणकर, कांता मोर्ये, प्रकाश शिर्के आणि प्रकाश पाणदरे यांनी सहभागी होऊन उपयुक्त सूचना मांडल्या. शेवटी सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले व सभा सांगता घोषित केली.


