सह संचालक डॉ. राधाकृष्ण पवार यांच्याकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्ग आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय पथकाने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाला नुकतीच भेट दिली. पुणे येथील क्षय व कुष्ठरोग विभागाचे सह संचालक डॉ. राधाकृष्ण पवार यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या पथकाने रुग्णालयातील सेवा-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.
या भेटीदरम्यान सह संचालक डॉ. राधाकृष्ण पवार यांनी रुग्णालयातील क्षयरोग व कुष्ठरोग निदानाची सद्यस्थिती, संशयित रुग्णांची शोधमोहीम आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली.
रुग्णालयात उपलब्ध असलेल्या ‘न्युक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्ट’ (NAAT) यंत्रणेची कार्यक्षमता आणि एक्स-रे (X-Ray) तपासणी सुविधेची पाहणी करण्यात आली. क्षयरोगाचे त्वरित आणि अचूक निदान करण्यासाठी या दोन्ही चाचण्यांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
क्षयरुग्णांची माहिती, त्यांचा नियमित औषधोपचार आणि ‘निक्षय पोषण योजने’ अंतर्गत मिळणारा थेट लाभ डीबीटी द्वारे रुग्णांपर्यंत पोहोचतो की नाही, यासाठी निक्षय पोर्टलवरील डिजिटल नोंदींची तपासणी करण्यात आली.
कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत रुग्णांचे वेळेत निदान, विकृती प्रतिबंध व पुनर्वसन (RCS) आणि नियमित औषधोपचार (MDT) या संदर्भातील कामकाजाचे मूल्यमापन करण्यात आले.
या आढावा बैठकी प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रेड्डी,डॉ. राधाकृष्ण पवार (सह संचालक, क्षय व कुष्ठरोग, पुणे), डॉ. जयवंत मोरे (जिल्हा क्षयरोग अधिकारी), डॉ. सतीश गुजलवार (सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा – कुष्ठरोग),
श्री. सुरेश मोरजकर (जिल्हा पी.पी.एम. समन्वयक), श्री. गणेश जाधव (आरोग्य निरीक्षक), डॉ. रेड्डी (वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी) उपस्थित होते. या प्रसंगी सह संचालक डॉ. राधाकृष्ण पवार यांनी शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत पोहोचवून तालुका क्षयरोग व कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.


