न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

संजू परब यांना नेमळे शिक्षण संस्थेचा जिल्हा आदर्श समाजभूषण पुरस्कार

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

समाजातील गरजूंच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करणारे हात, तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारे प्रयत्न आणि कोकणच्या मातीत रुजलेल्या कला-संस्कृतीच्या संवर्धनासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू जगन्नाथ परब. त्यांच्या प्रदीर्घ आणि बहुआयामी सामाजिक कार्याची दखल घेत नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेने जिल्हास्तरीय आदर्श समाजभूषण पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेमार्फत प्रदान करण्यात येणारे जिल्हास्तरीय समाजभूषण पुरस्कार, उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार आणि उपक्रमशील आदर्श शिक्षिका पुरस्कार यंदाही जाहीर करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. आत्माराम भिकाजी राऊळ यांनी पुरस्कारार्थींची नावे घोषित केली.
नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व आश्रयदाते कै. श्रीपाद गोविंद तथा तात्यासाहेब पोकळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श समाजभूषण पुरस्कार यंदा संजू परब यांच्या सामाजिक योगदानाला देण्यात येणार आहे.
मडुरा तसेच सावंतवाडी परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर आरोग्याचे संकट कोसळले, विवाहकार्याची जबाबदारी उभी ठाकली किंवा कौटुंबिक अडचणींनी जीवनाची वाट बिकट केली, अशा प्रसंगी परब यांनी अनेक कुटुंबांच्या मदतीला धावून जात वैयक्तिक आर्थिक मदतीतून माणुसकीची उब जपली आहे. केवळ मदत करून थांबणे नव्हे, तर ‘मदतीवर जगण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहा’ या विचारातून त्यांनी तरुणांना स्वावलंबी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत अनेक तरुणांना आत्मनिर्भरतेची दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
कोकणची ओळख असलेल्या दशावतारी कलेला आणि कलावंतांना प्रोत्साहन देण्याबरोबरच खेळाडूंच्या कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे. सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जपणूक आणि युवकांना प्रोत्साहन या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे.
‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हा विचार केवळ बोलण्यात न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत उतरविणाऱ्या परब यांच्या कार्याला त्यामुळेच समाजमान्यता मिळाली आहे
सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी शहरातील नागरिकांच्या विविध गरजा आणि समस्या जाणून घेत त्यांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. सामाजिक कार्यासोबतच सार्वजनिक जीवनातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.याच कार्याची दखल घेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेने संजू परब यांची जिल्हास्तरीय आदर्श समाजभूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे