सावंतवाडीतील दांडेलीत क्लबवर धाड… ११ जण ताब्यात
सिंधुदुर्ग / राजू तावडे
आरोस दांडेलीतील धनगरवाडी येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रमी जुगार अड्ड्यावर सावंतवाडी पोलिसांनी धाड टाकून ११ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास करण्यात आली.
घरमालक श्रीकृष्ण गोविंद पुनाळेकर यांनी राजकुमार दिनकर कवठणकर याला जुगार खेळण्यासाठी घरात क्लब चालविण्याची परवानगी दिल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. याठिकाणी रमीचा खेळ सुरू असून मोठ्या पैशांची बाजी लावली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
कारवाईत श्रीकृष्ण गोविंद पुनाळेकर, राजकुमार दिनकर कवठणकर, गणेश शांताराम सोपेटे, सुधीर सोमनाथ राऊळ, नंदकिशोर मनोहर नाईक, अनंत भास्कर सारंग, निरंजन आनंद नाईक, आनंद सोहन केरकर, गजानन महादेव वाडकर, श्रीधर प्रकाश पालव आणि मिलन शांताराम खवणेकर यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन, विविध रंगांचे प्लास्टिक कॉईन्स, पत्त्यांचे बॉक्स, पैशांच्या हिशोबाचे रजिस्टर, दोन गोल टेबल, २६ खुर्च्या, चार टिपॉय, एसी, व्होल्टास वॉटर प्युरिफायर तसेच जुगारासाठी वापरलेले बजाज पल्सर, दोन स्प्लेंडर, तीन ॲक्टिव्हा, ज्युपिटर आणि स्टार सिटी अशी एकूण आठ दुचाकी जप्त केल्या.


