न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कुडाळातील सावंत प्रभावळकर घराण्याच्या संस्थानकालीन गणपतीला २४४ वर्षे पूर्ण!

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

   ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कुडाळ येथील सावंत प्रभावळकर यांच्या संस्थानकालीन देवघरातील गणपतीला यावर्षी २४४ वर्षे पूर्ण होत आहेत. सावंत प्रभावळकर घराण्याचा हा गणपती १७ दिवसांचा असतो. या कालावधीत देवघरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन केले जाते.

या घराण्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सन १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राजा सूर्यभान प्रभावळकर हे प्रभानवल्ली येथून कुडाळ येथे आले. पुढे त्यांच्यावर कुडाळ सुभ्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आणि ते कुडाळमध्येच स्थायिक झाले.

त्यानंतर सन १७५७ मध्ये कान्होजी राजे प्रभावळकर यांनी कुडाळ येथे ‘प्रभावळकर वाडा’ उभारला. वाडा उभारणीनंतर २५ वर्षांनी, वाघसावंत टेंब (कुडाळ) येथे गुंड सावंत प्रभावळकर यांनी विशेष ‘देवघर’ बांधले. तेव्हापासून म्हणजेच तब्बल २४४ वर्षांपासून हा गणपती याच ऐतिहासिक देवघरात भक्तिभावाने पूजला जात आहे.

कुडाळमध्ये प्रभावळकर घराण्याची सध्या अकरावी पिढी कार्यरत असून, या ऐतिहासिक देवघरात सेवा देणारी ही पाचवी पिढी आहे. सध्या राजू सावंत प्रभावळकर व नितीन सावंत प्रभावळकर हे दोन्ही बंधू देवघरातील सर्व धार्मिक विधी आणि देवाचे कार्य अत्यंत निष्ठेने सांभाळत आहेत.

हा गणेशोत्सव सलग १७ दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या कालावधीत समस्त सावंत प्रभावळकर कुटुंबीयांची गौरी अडीच दिवसांसाठी माहेरवाशीण म्हणून येते. गौरी पुजना दिवशी सावंत प्रभावळकर घराण्यातील प्रत्येक वंशजाचे दोरे बांधण्याची ही एक आगळी वेगळी प्रथा आहे. हे सर्व वंशजाचे दोरे बांधून गौरीच्या पायावर ठेवले जातात व संपूर्ण वंशावळीच्या रक्षणाचा भार तीच्या पायावर सोपवला जातो. ही प्रथा कोकणात सावंत प्रभावळकर घराण्यातच पहायला मिळते. उत्सवाची सांगता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सत्यविनायकाची विशेष महापूजा करून केली जाते. शतकांहून अधिक काळ चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच वैभवाने आणि भक्तिमय वातावरणात जपली जात आहे.

4/5 - (3 votes)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे