आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या वाघिणींची ‘गोल्डन’ कामगिरी, दोन पोरींनी मिळवून दिलं सुवर्णपदक
मुंबई/ वृत्तसंस्था
एशियन गेम्स २०२६ मधील महिला भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा १४७ धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले आहे. एशियन गेम्समधील महिला भारतीय संघाचे हे सलग दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. टॉस जिंकत भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना २० ओव्हरमध्ये २१६-३ धावा केल्या होत्या. भारताकडून सलामावीर स्मृती मानधना हिने सर्वाधिक ७९ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली होती. त्यासोबतच शेफाली वर्मा ४८ धावा आणि रिचा घोषने नाबाद ४९ धावांची खेळी केली होती.
या धावांचा पाठलाग करताना लंकेचा ६९ धावांवर ऑल आऊट झाला. भारताच्या गोलंदाजांसमोर लंकेच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. फायनल सामन्यात भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ विकेट तर शेफाली, श्रेयांका आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन विकेट नावावर केल्या होत्या. श्रीलंका संघाच्या सात खेळाडूंना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. तर यामधील तीन खेळाडू शून्यावर आऊट झाले. एशियन गेम्स 26मधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.


