न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

एमसीएचे सदस्य राहुल शेवाळे यांच्याकडून जिमखाना मैदानाची पाहणी, उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांचा पुढाकार

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

  सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदानाची विविध स्पर्धांसाठी दर्जेदार उभारणी करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि क्रीडा व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. बुधवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) चे मुख्य सदस्य राहुल शेवाळे यांनी सावंतवाडीतील जिमखाना मैदानाला प्रत्यक्ष भेट देऊन मैदानाची पाहणी केली. भविष्यात या मैदानाचे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसोबत टाय-अप करून येथे रणजी करंडक सामने, तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करता यावे, असा दर्जा या मैदानास मिळवून देण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची आहे.

राहुल शेवाळे हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) अंतर्गत पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचे मुख्य सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांनी सावंतवाडी जिमखाना मैदानाला दिलेली भेट ही या क्रीडांगणाच्या नूतनीकरण व विकासासाठी महत्त्वाचे आहे. या पाहणीदरम्यान उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी राहुल शेवाळे यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले.या पाहणी दौऱ्याप्रसंगी सावंतवाडी नगरपरिषदेचे क्रीडा व आरोग्य सभापती श्री. सुधीर आडिवरेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ज्येष्ठ क्रिकेटर दिनेश कुबडे यांच्यासह शहरातील अनेक दिग्गज खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधा मिळाव्यात आणि स्थानिक गुणवंत खेळाडूंना रणजी व राज्यस्तरीय क्रिकेट खेळण्यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, ही सावंतवाडीकरांची अनेक वर्षांची मागणी आहे. राहुल शेवाळे यांच्या भेटीमुळे आणि नगरपरिषदेच्या या सकारात्मक पुढाकारामुळे भविष्यात जिमखाना मैदानावर भव्य सामने रंगणार, अशी आशा निर्माण झाली असून स्थानिक खेळाडू व क्रिकेटप्रेमींमध्ये याबाबत उत्सुकता आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे