वेत्ये येथून मोटारसायकल चोरी
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील वेत्ये येथे हायवेच्या शेजारी असलेल्या एका उघड्या शेडमध्ये उभी केलेली लाल-काळ्या रंगाची हिरो कंपनीची एचएफ डीलक्स मोटारसायकल (क्र. एम एस १० डीई ६८६६) चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री अज्ञात चोराविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी १७:३० वा. दरम्यान जितेंद्र गावकर यांच्या वेत्ये येथील हायवेच्या शेजारील उघड्या शेडमधून या मोटारसायकलची चोरी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील व पोलीस अमंलदारांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल धोत्रे हे करत आहेत.


