गोवा बनावटीच्या २२ लाख ८० हजारांच्या दारूसह टेम्पो जप्त; सावंतवाडी पोलिसांची धडक कारवाई, दोघांना अटक
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी तालुक्यातील सातोळी-बावळट येथे बांदा ते आंबोली जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सावंतवाडी पोलीस आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारा आयचर टेम्पो पकडला. या कारवाईत २२ लाख ८० हजार रुपयांच्या दारूसह १५ लाखांचा टेम्पो असा एकूण ३७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार रुक्मागद विश्वनाथ मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार सातोळी-बावळट येथे नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी बांदा बाजूकडून येणाऱ्या आयचर वाहनाला (क्रमांक MH-45 AF-1540) थांबवून पाहणी केली असता, त्यात बिगरपरवाना बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाणारी गोवा बनावटीची दारू आढळून आली.
या वाहनात ‘Royal Impact Grain Whisky’ च्या ७५० मिलीच्या एकूण ३८० बॉक्स (प्रत्येक बॉक्समध्ये १२ बाटल्या, एकूण ४,५६० बाटल्या) सापडले. जप्त केलेल्या या दारूची बाजारभावाप्रमाणे किंमत २२ लाख ८० हजार रुपये आहे. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला १५ लाख रुपयांचा आयचर टेम्पो पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २५७/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), ८१ व ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत एकनाथ सुखदेव इंगोले (वय २६, रा. बामनी, ता. सांगोला, जि. सोलापूर),
भिमराव बंडू शेटे (वय २६, रा. सिकंदर टाकळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला अटक करून गुन्हा नोंदविला आहे. प्रविण दत्ताराम खांडेकर (वय २७, रा. निजामपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा फरार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम, जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीमती मुल्ला, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील व पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. सदर गुन्ह्याची नोंद महिला पोलीस हवालदार कदम यांनी केली असून, पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील (सावंतवाडी पोलीस ठाणे) करीत आहेत.


