शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडण्याची आमदार दीपक केसरकर यांची असफल धडपड: डॉ. जयेंद्र परुळेकर
सिंधुदुर्ग / राजू तावडे
शक्तीपीठ महामार्ग रेडी बंदराला जोडण्याची आमदार दीपक केसरकर यांची असफल धडपड हि शक्तीपीठ महामार्ग (खरंतर एक्स्प्रेस वे) पर्यटकांसाठी होण्यासाठी नसून प्रामुख्याने विदर्भातील खनिज संपत्ती गोवा बंदरापर्यंत पोहचवण्यासाठी आहे, म्हणूनच गोव्यासोबत त्यातील काही भाग खनिजे रेडी बंदरातून परदेशात पाठवता येतील का हा त्यांचा प्रयत्न आहे, अशी टीका उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात डॉक्टर परुळेकर म्हणतात, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाची अलाईनमेंट बदलण्यासाठी ते स्वतः प्रयत्नशील आहेत हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. चौकूळ मळगाव मार्गे रेडी बंदर जोडणार अशी वल्गना ते करत आहेत.
कदाचित नजिकच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जागोजागी येणाऱ्या मायनिंग प्रकल्पांचे खनिज रेडी बंदरापर्यंत नेण्यासाठी आमदार केसरकर यांचे हे नियोजन आहे असा संशय डॉ. परुळेकर यांनी व्यक्त केला.
दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील ज्या चौदा गावांमधून हा महामार्ग प्रस्तावित आहे तेथील ग्रामस्थांचा तीव्र विरोध, तेथील जैवविविध निसर्ग, वन्यजीव या बद्दल आमदार केसरकर काहीही बोलत नाहीयेत. या चौदा गावांपैकी सहा गावे ही इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणून जाहीर झालेली आहेत. उरलेल्या आठ गावांचा समावेश जुलै २०२६ महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या वन पर्यावरण मंत्रालयाच्या सातव्या अधिसूचनेत इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणून समावेश करण्यात आलेला आहे.
हे होत असतानाच मतदारसंघाचे आमदार सदर महामार्गासाठी वेगवेगळ्या अलाईनमेंट सुचवत आहेत आणि महसूल खात्याकडून प्रस्तावित गावांमध्ये सूचना आणि हरकती संदर्भात गावातील ग्रामस्थांची जनसुनावणी घेण्यात येत आहे. अजूनही या महामार्गाचा आराखडा निश्चित झालेला नसताना त्या महामार्गामुळे होणारा पर्यावरण आघात अहवाल (EIA report) केलेला नसताना घाईघाईने अशा जनसुनावण्या का घेण्यात येत आहेत? एवढी घाई का? याविषयी कोणाचा दबाव आहे? चौदा पैकी अनेक गावांनी आम्हाला हा महामार्ग आमच्या गावातून नको असेच सांगितलेले आहे आणि उरलेल्या गावांमध्ये महामार्गाच्या विरोधात वातावरण आहे.
विदर्भ कोकणाला जोडणारा नागपूर रत्नागिरी महामार्ग आता शेवटच्या टप्प्यात आहे,असे असताना विदर्भातून गोव्याला आठ तासांत येण्याची घाई नक्की कोणाला आहे?
एकंदरीत पेट्रोल डिझेलचे दररोज वाढणारे भाव पाहता नागपूरहून गोव्याला गाडीने येण्यापेक्षा विमानाने येणे पर्यटकांच्या खिशाला परवडणारे ठरेल असे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.


