महालय श्राद्ध… अर्थात म्हाळवस दिवस सुरू
महालया….
“गणपती विसर्जनानंतर म्हाळवस सुरु होतो. प्रतिपदा म्हणजे अनसूद म्हाळ. त्या वर्षी जी पुरुष मंडळी निधन पावतात त्यांचे पहिले श्राद्ध. महिलांच्या श्राद्धास भरणी म्हणतात. ती तृतीया किंवा चतुर्थीस येते. भरणीसाठी तीन जेवणकरी ठेवतात. ते आपले नातेवाईक असावेत. भाऊबंद नकोत. भरणी व म्हाळाचे आमंत्रण सर्व गावास असते. पिंडदान नसेल तर कार्य घरगुतीच असते. म्हाळ घातला तर घरचे एक जोडे, बाहेरची चार जोडी, दोन जेवणकरी, एक आकुवारीण(कुमारिका) व एक निमा(कुमार) असे नियोजन करावे लागते. भटजीन्कडून पिंडपूजा आटोपल्यानंतर त्यांनी दिलेले पाणी जेवणकरयाच्या हातावर घालून त्यांना गंधाक्षता लावायच्या. तुळशीची वाडी, इसवाट्याची वाडी, अग्नी, गाय, पितरांसाठी चार (वडील, आजोबा, पणजोबा व एक निर्वशी) व जागेवर एक अशा किमान नऊ वाड्या काढायची पद्धत आहे. जेवणकरांना आकीत लावल्यावर बाहेरच्या वाड्या ठेवल्या जातात. गाईच्या पानास पूजले जाऊन प्रथम अग्नीचा नैवेद्य दिला जातो. म्हाळ असेल तर यजमान-याजमानीन दोघांनी सुकळ सोडायचे असते. म्हणजे एक केळीचे पान घेऊन ते पंगतीसमोर पूर्वपश्चिम ठेवायचे असते. त्यावर विडा ठेवायचा. यजमानाने उकिडवे बसून यजमानीने पळीने त्यांच्या ओंजळीत पाणी घालायचे. ओंजळीत घातलेले पाणी कोपराकडून विड्यावर सोडायचे. नंतर दुध घालून तसेच सोडायचे. असे पाच वेळा करायचे. नंतर विड्यासाहित पान उचलून मस्तकी लावायचे व पानाचे जागी स्वच्छ करायचे. यजमानाने पंगतीसमोर हाताने पाणी सोडून नमस्कार करून मंडळींस ‘जेवायला सुरुवात करा’ असे सांगायचे. सवाष्ण बसलेल्या जागी देखील असेच करायचे. यजमानाने संध्याकाळी एक दशमी खायची. घरातील सवाष्ण दिवंगत झाल्यास अहेव नवमी दिवशी सवाष्ण बोलवून जेवण करतात. ज्यांना तिथी ज्ञात नसते अथवा अडचणीमुळे तिथीस जेवणकरी ठेवू न शकल्यास सार्वपित्री अमावस्येदिवशी (नगरम्हाळ) ते ठेवले जातात. कुमार मुलगा दिवंगत झाल्यास फक्त दहावे व बारावे करतात. असा हा म्हाळवस.
दिवस म्हाळवसाचे –
औरंगजेबाने आपले वडील शहाजानला कैद केले होते. तेव्हा शहाजानने एका खलिफ्यात औरंगजेबाला लिहिताना त्याने असे म्हटले आहे की, ‘‘धन्य आहेत ते हिंदू जे आपल्या मृत आई-वडिलांनाही खीर आणि हलवा पुरीने तृप्त करतात आणि तू आपल्या जिवंत बापालाही पाण्याचं मडकंसुद्धा देऊ शकत नाही. तुझ्यापेक्षा ते हिंदू चांगले जे मृत्युपूर्वी आणि मृत्यूनंतरही स्मरण साखळी तोडत नाहीत.’’
अन्नदान करण्याची परंपरा गेल्या अनेक शतकापासून कोकणात सुरू आहे. तशी ती अन्य भागातही आहे. परंतु, कोकणातील परंपरेला येथील वैशिष्टयाची एक झालर आहे. ‘अतिथी देवो भव’ यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणात महालय पर्वात ‘जेवणकारी’ ठेवण्याची अनोखी खासियत आहे.
पूर्वजांच्या नावाने मिष्ठान्न जेवण घालताना देण्यात येणारा मानसन्मान आणि करण्यात येणारे आदरातिथ्य कोकणी ढंगाचे असते. एरव्ही गावातील असणा-या व्यक्ती अन्य दिवसात त्यांना कोण विचारत नसेल.
परंतु, त्या दिवशी ज्या घरात बोलविले जाते, तेथे दिला जाणारा मानसन्मान हा पूर्वजांच्या दिमाखाप्रमाणे असतो. त्यांचे पाय धुण्यापासून ते भोजनासाठी पाटावर बसेपर्यंत खास व्यवस्था करण्यात येते.
भाद्रपदाची पौर्णिमा झाली की, म्हाळवसाच्या पंक्ती सुरु होतात. सर्वपित्री अमवास्येला ही अन्नदानाची परंपरा थांबते. भारतीय संस्कृतीचे एक मोठे वैशिष्टय़ आहे की, जिवंतपणी विविध संस्कारांद्वारे, धर्मपालनाद्वारे मानवाला समृद्ध बनविले जाते आणि मृत्यूनंतरही त्याचे स्मरण केले जाते. ही स्मरणाची परंपरा कायम जपली जाते.
भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा श्राद्ध पक्षाच्या रुपाने साजरा केला जातो. श्राद्धाचा महिमा व विधीचे वर्णन विष्णू, वायू, वराह, मत्स्य आदी पुराणांमध्ये तसेच महाभारत, मनुस्मृती शास्रमध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळते. आत्मा याच दिवसात पुन्हा पृथ्वीवर अवतरतात असा समज आहे.
जन्म-मृत्यूच्या फे-यातून मुक्त होणे म्हणजे देवयान मार्ग समजला जातो. देहावसान झाल्यानंतर धर्मसंस्कृतीत कल्याणाची भावना करणे हे अपूर्व शुभकार्य समजले जाते. त्यातूनच म्हाळवसाची प्रथा रूढ झाली, असे ज्येष्ठ लोक सांगतात. प्रेतात्मे या म्हाळवसात मृत्यूलोकात उतरतात का? हा वादातीत विषय असला तरी, या मागची परंपरा आणि प्रथेमागचे विज्ञान समजून घेणे अगत्याचे आहे.
अनेकवेळा नास्तिकतेचे समर्थन करणा-यांबाबत असेही सांगितले जाते की, येथे दान केलेले अन्न पितरांपर्यंत कसे पोहोचू शकते यावर भारताचे चलन ‘रुपया’, अमेरिकेत ‘डॉलर’, लंडनमध्ये ‘पौंड’, जपानमध्ये ‘येन’, दुबईत ‘दिनार’ अशी चलने आहेत.
जर येथे पोहोचायचे झाल्यास चलनातून व्यवहार करावा लागतो. अशा वेळी रुपयाचे चलन बदलून दिले जाते. त्याप्रमाणे ईश्वराकडे आपले पुण्य पोहोचण्यासाठी श्राद्धात अर्पण केलेल्या वस्तू, पूर्वजांच्या स्मरणातून केलेल्या अन्नदानाचे भाग्य मिळते, असे सांगितले जाते.
श्राद्धाचा विधी करताना पितरांसाठी विषम अर्थात १,३,४,७ तर देवतांसाठी सम अर्थात २,४,६,८ अशा संख्येत विशिष्ट माणसांना म्हणजे ‘जेवणकारी’ मंडळींना बोलावून त्यांना भोजन घालण्याची परंपरा आहे. श्राद्धाच्या शेवटी दान देताना हातात जव आणि कुश (दर्भ) याबरोबर पाणी घेऊन अध्र्य दिले जाते. यावेळी पिंडदानही केले जाते.
काहीही असो, श्राद्धाचा विशेष फायदा असा की, मृत्यूनंतरही जिवाचे अस्तित्व राहते. पूर्वजांची आठवण राहते. संपत्तीचे सामाजिकरण होते. गोरगरिबांना, नातेवाईकांना मिष्ठान्न भोजन देण्याचे समाधान मिळते. अन्य भोजन समारंभात रजो-तमो गुण असतात. परंतु, श्राद्धाच्या हेतूने दिले गेलेले भोजन धार्मिक भावना वाढविते. परलोकासंबंधी भक्तीभाव विकसित करते.
दानधर्म करायला हवा, यासाठी आग्रहाने संस्कृतीच आपल्याला वळविते. औरंगजेबाने आपले वडील शहाजानला कैद केले होते. तेव्हा शहाजानने एका खलिफ्यात औरंगजेबाला लिहिताना त्याने असे म्हटले आहे की, ‘‘धन्य आहेत ते हिंदू जे आपल्या मृत आई-वडिलांनाही खीर आणि हलवा पूरीने तृप्त करतात आणि तू आपल्या जिवंत बापालाही पाण्याचं मडकं सुद्धा देऊ शकत नाही, तुझ्यापेक्षा ते हिंदू चांगले जे मृत्युपूर्वी आणि मृत्युनंतरही स्मरण साखळी तोडत नाहीत.’’
‘महालय’ म्हणजे मोठे श्राद्ध. महालयाचा अपभ्रंश होऊन म्हाळ म्हणण्याचा सोयीस्कर शब्द तयार झाला. कोकणात म्हाळाचे दिवस म्हणजे म्हाळवस असा शब्दप्रयोग झाला. पहिले महाश्राद्ध श्रीरामाने वनवासातून परतल्यावर दशरथ राजाला मुक्ती मिळविण्यासाठी घातल्याचे सांगण्यात येते. या म्हाळवसातील नवमीचा दिवस या तिथीला विशेष महत्त्व असते.
ज्यांच्या घरातून सुवासिनी मृत झाल्या आहेत, अशा महिलांची विशेष तिथी म्हणून साजरी केली जाते. यादिवशी सुवासिनींना मोठा मानसन्मान दिला जातो. खणानारळाने ओटी भरली जाते. अमवास्येला तर त्याहून अधिक महत्त्व आहे. या दिवशी म्हाळांचे मोठया प्रमाणात आयोजन केले जाते. ज्यांना आपल्या पितरांची तिथीच माहिती नाही ते सर्वपित्री अमवास्येचा मुहूर्त धरतात.
म्हाळवस म्हणजे वडा-सांबा-याचे दिवस. अन्नदानाचा हा कार्यक्रम गावागावात साजरा होतो. पितरांच्या नावाने अनेकजणांना बोलवून भोजन दिले जाते, अन्नदान केले जाते. जेवणका-यांचा हा कार्यक्रम मोठा असल्याने अनेक घरांमध्ये जेवणकारी राहणारी मंडळी पंधरा दिवस घरामध्ये पोहोचतच नाही. जेवणापूर्वी ‘आखित’ लावण्याची परंपरा आहे. भोजन झाल्यानंतर विडा दिला जातो. हा विडा मानाचा समजला जातो. काही ठिकाणी शिधा आणि भेटवस्तूही दिली जाते.
जेवणका-यांची असणारी चंगळ आणि पूर्वजांच्या स्मृतीची पंरपरा यात पंधरा दिवस कसे निघून जातात समजत नाही. आमच्या परिचयाचे असणारे ‘काका’ अनंत चतुर्दशीनंतर ते सर्वपित्री अमवास्येपर्यंत घरात जेवतच नाहीत. या दिवसात त्यांचे एक प्रहरी भोजन सुरू असते. जेवणकारी असणा-या व्यक्तींना उपवास धरणे अगत्याचे असते. त्यामुळे काका सकाळचे काही खात नाहीत आणि दुपारचे मिष्ठान्न भोजन केल्यामुळे रात्रीचे भोजन करत नाहीत.
काकांना एवढी मागणी की त्यांची पंधरा दिवस धावपळ असते. काही ठिकाणी आग्रहाचे निमंत्रण असल्यामुळे आणि एकाच दिवशी दोनदोन म्हाळ असल्यामुळे एका ठिकाणी जेवणकारी तर दुस-या ठिकाणी ते आपली उपस्थिती लावतातच. म्हाळवसात काकांच्या पायाला भिंगरी लागलेली असते. म्हाळाच्या उपस्थितीबरोबर ते रात्री भजन-कीर्तनात दंग होतात.
काही ठिकाणी या म्हाळवसात ‘कुळी’ वाचण्याची परंपरा आहे. दिवाळीच्या हंगामात ठाकर मंडळी अशी कुळी घरोघरी येऊन वाचतात. हा एक चालता बोलता इतिहास असतो. आपले पूर्वज कोण, पूर्वजांचे पूर्वज कोण होते याची वंशावळच गेयतेतून मांडली जाते.
या पूर्वजांचे स्मरण म्हाळा दिवशी व्हावे म्हणून सायंकाळच्या वेळी या कुळी वाचणा-या मंडळींना पाचारण करण्यात येते आणि मग कोणत्या पुत्राने कशासाठी दान केले यापासून ते त्यांचे पूर्वज कोण होते, पूर्वजांनी दानधर्म कसा केला होता या सर्वाची वंशावळीच पुढे आणली जाते. ही कुळी सांगण्याची पद्धतीही अनोखी अशी आहे. कोकणचे ते खास वैशिष्टय़ समजले जाते. नव्या पिढीला पूर्वजांच्या पराक्रमाची जाणीव व्हावी असा या मागचा हेतू असतो.
शहरी भागात म्हाळाचे स्वरूप सध्या बदललेले आहे. आता म्हाळासाठी जेवण करण्यासाठी घरात आवश्यक असणा-या माणसांची कमी असल्याने हॉटेलमधून ऑर्डर दिल्या जातात. काही ठिकाणी आचा-यांना निमंत्रित केले जाते. या म्हाळांच्या दिवसासाठी आचा-यांचे काही गटच सध्या सर्व सोयी पुरवितात.
आचा-यांच्या काही कंपन्या या म्हाळासाठी सक्रिय होतात, ही मंडळी खास पॅकेजही देतात. भांडी, भोजनाचे साहित्य, पदार्थ आमचे असतील. आपण फक्त मेनूकार्ड निश्चित करावे आणि जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ऑफर असते. काही ठिकाणी तर ही आचारी मंडळी आपल्या पॅकेजमध्ये जेवणका-यांचीही सोय करून देतात.
अलीकडे ग्रामीण भागात महिला बचतगटही म्हाळवसात मदतीसाठी पुढे सरसावतात. केळीच्या पानावरच्या भोजनाचा स्वाद त्याला धार्मिकतेची किनार आणि सर्व मंडळींचे एकत्र येणे ही एक अपूर्व पर्वणी असते. यासाठी मग पितरांची स्मृती जागविणे कोकणवासीयांना अवघड वाटत नाही.
आम्ही या लेखातील काही माहितीशी सहमत आहोच असे नाही
सोशल मीडिया साभार….


