पाळणेकोंड धरणाचे पाणी सोडल्याने सावंतवाडीकरांवर पाण्याचे संकट: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणातील पाणी सावंतवाडी नगर परिषदेने सोडल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी सुमारे ८ ते १० फूटांनी खाली गेली आहे. आगामी काळात पावसाची शक्यता कमी असल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन न केल्यास उन्हाळ्यात सावंतवाडी शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. अशी चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा जपण्याबरोबरच भविष्यातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी व्यक्त केले
संजू परब पुढे म्हणाले, सावंतवाडी नगर परिषद प्रशासनावर कोणाचाही वचक राहिलेला नाही, अशी टीका नागरिकांमधून होत आहे. प्रशासनाच्या कामकाजावर सत्ताधाऱ्यांचे अपेक्षित नियंत्रण नसल्याने शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नगरपालिका प्रभावीपणे चालविण्याबाबत सत्ताधाऱ्यांना स्वारस्य नसल्याचे चित्र निर्माण झाले असून, पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर तातडीने उपाययोजना न झाल्यास त्याचा फटका आगामी उन्हाळ्यात सावंतवाडीकरांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत नगरपरिषदेने त्वरित निर्णय घेणे आवश्यक असल्याचे श्री. परब म्हणाले.


