दुष्काळी स्थितीवर कलंबिस्त ग्रामस्थांची मात; श्रमदानातून उभारला वनराई बंधारा
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाण्याअभावी करपून जात असून, पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि विहिरी आटू लागल्या आहेत. अशा चिंताजनक परिस्थितीत सह्याद्रीच्या पट्ट्यातील सैनिकी परंपरा लाभलेल्या कलंबिस्त (ता. सावंतवाडी) गावाने जलसंधारणाची कास धरत संपूर्ण जिल्ह्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
कलंबिस्त – धावगिरेश्वर परिसरातील ओहोळात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून श्रमदानातून कच्चा वनराई बंधारा उभारण्यात आला. कलंबिस्त पंचक्रोशी दुग्धविकास संस्था, शिव साम्राज्य प्रतिष्ठान (गणशेळवाडी) आणि अन्नपूर्णा शेतकरी महिला बचत गट (राऊळवाडी) या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.
रविवारी सायंकाळी तिन्ही मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत श्रमदान केले. सिमेंट आणि मातीच्या पिशव्यांचा वापर करून जवळपास साडेतीन फूट उंचीचा आणि २० फुटांपेक्षा अधिक लांबीचा मजबूत बंधारा तयार करण्यात आला. या बंधाऱ्यामुळे ओहोळातील पाणी अडवले जाऊन परिसरातील १५ ते २० एकर भातशेतीला प्रत्यक्ष फायदा होणार आहे. तसेच भूजल पातळी वाढण्यास मदत होऊन गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे.
या अभियानाबाबत माहिती देताना दुग्ध संस्थेचे चेअरमन ॲड. संतोष सावंत म्हणाले, “कलंबिस्त गावात शेती, चारा आणि रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून आम्ही पुन्हा वनराई बंधाऱ्यांची संकल्पना हाती घेतली आहे. पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, गावात सुमारे २० ते २५ कच्चे बंधारे उभारण्याचा आमचा संकल्प आहे.”
या अभियानात अन्नपूर्णा शेतकरी महिला बचत गटाच्या महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत यांनी “हीच खरी जलक्रांतीची सुरुवात आहे,” असे सांगत प्रत्येक वाडीवर असे बंधारे उभारण्याचे आवाहन केले.
यावेळी अन्नपूर्णा महिला बचत गटाच्या अध्यक्षा शितल नाईक म्हणाल्या, “पाणी फाउंडेशनच्या प्रेरणेतून आम्ही हे अभियान सुरू केले आहे. पाणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा अभिनेते आमिर खान यांनी आमच्या कलंबिस्त गावाला भेट द्यावी, हे आमचे स्वप्न असून तिन्ही संस्थांच्या माध्यमातून हे अभियान आम्ही १०० टक्के यशस्वी करू.”
या प्रसंगी दुग्ध संस्थेचे सचिव रमेश सावंत, शिव साम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धेश सावंत, रोहन सावंत, स्वप्निल सावंत, विराज सावंत, सुभाष देसाई, सुषमा राऊळ, रंजना राऊळ, रश्मी गवस, शालिनी राऊळ, एकता राऊळ, सुप्रिया राऊळ, स्मिता राऊळ, लक्ष्मी राऊळ, रुक्मिणी राऊळ, राजश्री राऊळ, जयश्री राऊळ, सुनिला राऊळ, वनिता गवस, सविता गवस, कविता जाधव, जागृती सावंत, दिपाश्री जाधव यांच्यासह तिन्ही संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.


