न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कुणकेरी मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामपंचायतीचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

सिंधुदुर्ग / मनोज घाटकर

सावंतवाडी :05 ऑक्टोबर 26,  कुणकेरी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून काही ठिकाणी पाणी साचून रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुणकेरी ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांच्याकडे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कुणकेरीच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन काही कालावधी लोटला असला तरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी पाणी साचून रस्त्याचे नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत ग्रामपंचायतीमार्फत यापूर्वीही संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, कंत्राटदार परांजपे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नाहीत. तसेच प्रत्यक्ष भेट झाल्यास समस्येबाबत समाधानकारक प्रतिसाद न देता उडवाउडवीची भाषा केली जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संबंधित कामाची पाहणी करून दोष दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसाठी कुणकेरीच्या सरपंच मा. श्रीमती सोनिया संजय सावंत यांच्या अनुमतीने साहिल संजय सावंत, सागर परब, अंकित परब, साहिल गावडे, बाबी परब, कृष्णा सावंत, सुरज सावंत, गौरव मुळीक आणि अक्षय सावंत या युवकांनी आवाज उठवला आहे.

वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वाहनांची अवस्था खिळखिळी होत आहे. वाहनांच्या मेंटेनन्सचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत असून रात्रीच्या वेळी खड्डे लक्षात न आल्याने अपघाताची शक्यताही वाढली आहे.

त्यामुळे रस्ता केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय नसून त्यांच्या सुरक्षिततेचा आणि वाहनांच्या नुकसानीचा गंभीर प्रश्न बनला आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांच्या या मागणीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने कार्यवाही होणार का, याकडे कुणकेरी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे