आरोग्य विभागात २१ लाखांचा भ्रष्टाचार :२५ वर्षांत असा घोटाळा जनतेने कधीच पाहिला नव्हता: संजू परब
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा सावंतवाडीच्या संपूर्ण जनतेचा आणि शिवसेनेच्या लढ्याचा विजय आहे, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब आणि महिला जिल्हाप्रमुख ॲड.नीता सावंत-कविटकर यांनी व्यक्त केले. तर आमच्या महिला नगरसेवकांना सेटलमेंटसाठी सत्ताधाऱ्यांनी ऑफर दिल्याचा दावा करत पाणीपुरवठा विभागात गैरव्यवहारातून अदा करण्यात आलेली रक्कम पूर्ण वसुल होत नाही तोपर्यत शिवसेना शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. तसेच आरोग्य विभागात देखील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते बाबू कुडतरकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, ॲड. सायली दुभाषी, महिला शहर प्रमुख भारती मोरे उपस्थित होत्या.
यावेळी श्री. संजू परब म्हणाले, सभापतींनी राजीनामा दिला असला तरी शिवसेना एवढ्यावर समाधानी नाही. पाणीपुरवठा विभागात गैरव्यवहारातून अदा करण्यात आलेली रक्कम पूर्ण वसुली झाली पाहिजे. त्यानंतरच शिवसेना शांत बसेल. पाणीपुरवठा विभागानंतर आता आरोग्य विभागातही मोठा गैरव्यवहार झाला असून तोही लवकरच पुराव्यानिशी जनतेसमोर आणला जाईल. गेल्या २५ वर्षांत सावंतवाडी शहरात असा घोटाळा जनतेने कधीच पाहिला नव्हता. मात्र, नवीन सत्ताधारी आल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागात अशोभनीय कारभार सुरू झाला आहे. पाणीपुरवठा विभागात पहिली दोन बिले अदा झाल्यानंतर तिसरे बिल काढताना शिवसेनेच्या दोन महिला नगरसेवकांनी ते रोखले आणि मोठा घोटाळा होण्यापासून वाचवला. आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत पारदर्शक कारभार आणि सुसंस्कृती जपली आहे. पालिकेचा कारभार जनतेच्या पैशातून चालत असल्याने तो पूर्णपणे पारदर्शक असला पाहिजे, हीच शिवसेनेची भूमिका असल्याचे परब यांनी स्पष्ट केले. शिवसेना महिला नगरसेवकांनी सेटलमेंटची ऑफर देखील आलेली. मात्र, दीपक केसरकर यांच्या विचाराने चालणारे आमचे नगरसेवक असून जनतेच्या पैशांचा अपव्यय होऊ देणार नाही.
आरोग्य विभागात अवघ्या दहा लाख रुपये किंमतीचे मशीन तब्बल २२ लाख रुपयांना खरेदी दाखवण्यात आले आहे. इतर ठिकाणी कमी किंमतीत मिळणाऱ्या या मशीनसाठी १० ते १२ लाखांचा फरक दाखवून मोठा भ्रष्टाचार केला गेला आहे. तसेच पाणीपुरवठा विभागाचे रजिस्टरच गायब झाले असून केवळ अडीच लाखांचा माल आणून ४७ लाख रुपयांची बिले काढण्यात आली. या माध्यमातून सुमारे २५ लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचे ॲड. नीता सावंत-कविटकर यांनी कागदपत्रांसह सिद्ध केले. तसेच नगराध्यक्षांनी देखील या संदर्भातील बीलांवर सही केल्याचा आरोप त्यांनी केलाय. पाणीपुरवठा घोटाळा शिवसेनेने बाहेर काढल्यामुळेच सभापतींना राजीनामा द्यावा लागला आहे. आता आरोग्य विभागातील २१ लाखांचा घोटाळाही लवकरच उघड करू. सावंतवाडीच्या जनतेला पारदर्शक कारभार मिळवून देण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या विचारांवर चालत नगरसेवक म्हणून कार्यरत राहू, असा पुनरुच्चारही त्यांनी शेवटी केला.


