न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंबेगावात नवरात्र घटस्थापना उत्सव आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे ३५ वे सामुदायिक पारायण!

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव नवरात्र घटस्थापना उत्सवानिमित्त आंबेगाव येथील श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिरात मंगळवार, १३ ऑक्टोबर ते मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे ३५वे सामुदायिक पारायण आयोजित करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त आठ दिवस विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे.

श्री देव लिंग क्षेत्रपाल व श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपेने तसेच संतांच्या शुभाशीर्वादाने, पंचमानकरी, आंबेगाव ग्रामस्थ, देणगीदार आणि हितचिंतकांच्या सहकार्याने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात सर्व भाविकांनी सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मान्यवरांच्या हस्ते उत्सवाचे उद्घाटन

मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता सौ. श्रद्धा श्रीराम भावे व श्री. श्रीराम सिताराम भावे यांच्या हस्ते उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आंबेगाव येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

आठ दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

उत्सवाच्या कालावधीत दररोज पहाटे ५ वाजता काकड आरतीने दिवसाची सुरुवात होणार आहे. सकाळी ९ ते १२ या वेळेत सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर सायंकाळी हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्री ९.३० वाजल्यापासून ग्रामस्थांची भजने, धनगरी नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दररोज सकाळी श्री देव लिंग क्षेत्रपाल देवाच्या नामस्मरणाने मंदिर परिसर भक्तिमय होणार असून, विविध गावांतील ह.भ.प. महाराजांच्या प्रवचन व कीर्तनातून भाविकांना आध्यात्मिक विचारांची मेजवानी मिळणार आहे.

विविध गावांतील महाराजांची प्रवचने व कीर्तने

या कार्यक्रमांतर्गत मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. श्री. निवृत्ती मेटकरी महाराज, आरोंदा; बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. श्री. रवींद्र तावडे महाराज, डिगस, ता. कुडाळ; गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. श्री. पंढरीनाथ सावंत महाराज, आरोंदा; शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. श्री. उदय शास्त्री महाराज, सांगेली; शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. श्री. श्रीकृष्ण घाटे महाराज, देवगड; रविवार, १८ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. श्री. नवलाई राणे महाराज, कोल्हापूर; तर सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. श्री. संगाजी वहाळ महाराज, कोल्हापूर यांची प्रवचने व कीर्तने होणार आहेत.

मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी ह.भ.प. श्री. संगाजी वहाळ महाराज, कोल्हापूर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.

१९ ऑक्टोबरला सुहासिनींचा दीपज्योती कार्यक्रम

सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता सुहासिनींचा दीपज्योती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सौ. रेश्मा राजाराम शिंदे व श्री. राजाराम बिनू शिंदे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

२० ऑक्टोबरला दिंडी आणि महाप्रसाद

मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता दिंडी काढण्यात येणार असून, सकाळी १० वाजता ह.भ.प. श्री. संगाजी वहाळ महाराज, कोल्हापूर यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी श्री देव लिंग क्षेत्रपाल नवरात्र घटस्थापना व ज्ञानेश्वरी पारायण उत्सव समिती, पंचमानकरी आणि आंबेगाव ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. सर्व भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन श्री देव लिंग क्षेत्रपाल व श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाचा आणि सामुदायिक पारायणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे