सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ए.सी.यंत्रणा बंद, सामाजिक बांधिलकीचा उपोषणाचा इशारा
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील ए.सी.यंत्रणा गेले दोन महिने बंद असूनही रुग्णालय प्रशासन याबाबत दखल घेत नसल्यामुळे आता रुग्णांना घेऊन उपोषणास बसणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिला आहे. आय.सी.यु.विभागाची ही दयनीय अवस्था का झाली? याला जबाबदार कोण, याची सखोल चौकशी व्हावी. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठापनचे रवी जाधव यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग, वैद्यकीय अधिक्षक सावंतवाडी यांना उपोषणाची नोटीस देणार असल्याचे श्री.जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. आय.सी.यु. विभागातील विभागातील रुग्णांचे हाल तातडीने थांबावेत.
हॉस्पिटल मधील नव्या आयसीयू विभागातील गेले दोन महिन्यापासून एसी पूर्णपणे बंद आहे सदर आयसीयू पूर्णपणे बंदिस्त असल्यामुळे रुग्ण अक्षरशा त्यामध्ये गुदमरत असल्याची परिस्थिती समोर आली आहे. यापूर्वी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिलेले स्टॅंडिंग फॅनचा आधार सध्या रुग्ण घेत आहेत. लाखो रुपये खर्च करून रुग्णांसाठी तयार केलेली लिफ्ट उद्घाटन होऊन सुद्धा अद्यापही कार्यरत नाही. तसेच अजूनही रुग्णांचे बांबूळीला रेफर करण्याचे प्रमाण कमी झालेले दिसत नाही. असा आरोप रवी जाधव यांनी केला आहे.
काही दिवसापूर्वी हॉस्पिटल मधील संडास बाथरूम ओव्हर फ्लो झाले होते. ड्रेनेज मधून पाणी रस्त्यावर येत होते. रुग्णांचे प्रचंड हाल झाले होते. त्यावेळी हॉस्पिटल मधील ड्रेनेजच्या टाक्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान संस्थेच्या रूपा मुद्राळे हिने स्वखर्चाने साफ करून घेतल्या होत्या तर आठ दिवसापूर्वीच आरोग्य सभापती सुधीर आरीवडेकर व नगर परिषदेच्या सहकार्यातून संपूर्ण हॉस्पिटल परिसराची साफसफाई करून घेतली.
उष्णता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ( I. C. U ) तसेच इतर विभागामधील सर्व ए.सी बंद आहेत त्यामुळे रुग्णांचे होत असलेले हाल पहावत नाहीत. याऐ सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक यांना निवेदन सादर करणार आहोत. जर येत्या आठ दिवसात सर्व विभागातील रुग्णांना सोयी सुविधा तसेच ए.सी सुरू न झाल्यास सदर रुग्णांना घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी दिला आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सांगळे शनिवारी यांनी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीला भेट दिली. तेव्हा रुग्ण कल्याण समिती सदस्य म्हणून पूर्व कल्पना देणे आवश्यक होते. मात्र तशी कोणतीही कल्पना न देता राजकीय स्वरूपात दौरा करणे योग्य नाही. यासंदर्भात काम करणाऱ्या संस्था, संघटनांनाही रुग्णालय प्रशासनाने कळवणे आवश्यक होते असे रवी जाधव यांनी म्हटले आहे.


