न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये; माजी नगराध्यक्ष संजू परब कडून तीव्र नाराजी 

 

सिंधुदुर्ग  / राजू तावडे

   सावंतवाडी शहरातील सालईवाडा परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे अशुद्ध पाणी घुसल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष पसरला असून, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेकडे शहरातील जुन्या पाईपलाईन नेमक्या कुठून गेल्या आहेत, याविषयी कसलेच स्पष्ट नियोजन अथवा नकाशे उपलब्ध नाहीत. प्रशासनाच्या याच हलगर्जीपणामुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे आज नागरिकांच्या घरोघरी ड्रेनेजमिश्रित अशुद्ध पाणी पिण्यासाठी पुरवले जात आहे. उपवनसंरक्षक कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयाच्या समोरून खोदून ठेवलेल्या पाईपलाईनच्या कामाबाबतही संजू परब यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला असून हे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी शहरात ५७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन तसेच एमएनजीएल (MNGL) गॅस पाईपलाईनसाठी ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले होते. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची पूर्ववत डागडुजी (रिस्टोरेशन) करण्यात आलेली नाही. त्यामुळे या परिसरात मोठे खड्डे पडले असून रस्त्यांवर जागोजागी चर पडल्याने वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. आता पावसाळा संपला असल्याने प्रशासनाने तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करून पडलेले खड्डे बुजवावेत आणि रस्ते पूर्ववत करावेत, अशी मागणी संजू परब यांनी केली आहे.

दरम्यान, सध्या गॅस पाईपलाईनच्या खड्ड्यांमध्ये पुन्हा खोदाई करून ड्रेनेजच्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी स्थानिक नगरसेविका सुकन्या टोपले यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब हेही उपस्थित होते. या पाहणी दरम्यान नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील ज्ञानेश्वर पाटकर, ओंकार सावंत, शाम रेमुळकर, अथर्व सावंत, विनोद सावंत, प्रवीण मोरजकर, राजू भाट, अमित आरवारी यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांकडून दिला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे