न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

कसाल येथे शब्दांगण ग्रंथप्रदर्शनाची वाचकांना मेजवानी

 

सिंधुदुर्ग  / राजू तावडे 

  कसाल येथे येत्या रविवारी (१ नोव्हें.) होणाऱ्या पहिल्या घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनात ‘शब्दांगण’ हे पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. परुळे येथील रहिवासी श्री. लक्ष्मण राठिवडेकर यांच्या या ग्रंथप्रदर्शनात नामवंत मराठी प्रकाशकांची पुस्तके रसिकांना सवलतीत उपलब्ध होणार आहेत.

दरम्यान या साहित्य संमेलनाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून साहित्यरसिकांकडून आयोजकांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. श्री. राठिवडेकर या ग्रंथप्रेमी गृहस्थांनी शब्दांगण या फिरत्या ग्रंथप्रदर्शनाची स्थापना पुणे येथे ३१ मार्च २०१४ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केली. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या कोकणात कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्यावतीने वेळोवेळी पुस्तक प्रदर्शने आयोजित केली जातात. या पुस्तक प्रदर्शनात विविध विषयांची, नामवंत लेखक व प्रकाशकांची लहानांपासून ज्येष्ठ वाचकांना उपयुक्त हजारो पुस्तके उपलब्ध असतात. पुस्तकांवर खरेदीनुसार सवलतही असणार आहे. ही प्रदर्शने चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र, तसेच गोवा – पणजी, म्हापसा, फोंडा, मडगांव आणि बेळगाव,कर्नाटक या राज्यातूनही केली आयोजित गेली आहेत. शाळा, महाविद्यालय, विविध कंपनी अशा ठिकाणीही शब्दांगण पुस्तक प्रदर्शने आयोजित केली जातात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथदालनांची उणीव आहे. त्यामुळे कसालसारख्या छोट्या गावात होणाऱ्या या साहित्य संमेलनात वाचकांना उत्तमोत्तम पुस्तके खरेदी करण्याची संधी मिळणार आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रीया संमेलनाचे नियोजित अध्यक्ष कवी डॉ. महेश केळुसकर यांनी दिली आहे. संमेलनाचे नियोजित उद्घाटक नाट्यकर्मी श्री. श्रीनिवास नार्वेकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यप्रेमींसाठी संमेलन आणि पुस्तक प्रदर्शन ही एक पर्वणीच ठरणार आहे. जिल्ह्यातील चोखंदळ वाचकांनी या दोन्ही उपक्रमांचा लाभ घ्यावा.

जिल्ह्यातील रसिक वाचकांनी या संमेलनाला दिवसभर उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, तसेच ग्रंथ प्रदर्शनात आपल्या आवडीची पुस्तके खरेदी करुन वाचन संस्कृतीच्या वाढीला हातभार लावावा, असे आवाहन आयोजक सतीश लळीत व डॉ. सई लळीत यांनी केले आहे. ग्रंथप्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल त्यांनी श्री. राठिवडेकर यांचे आभार मानले आहेत.

1/5 - (1 vote)

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे