महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी! …. राज्यातील ६ लाख १९ हजार विद्यार्थ्यांना दिले विद्युत सुरक्षेचे धडे अन् हरित ऊर्जेचा जागर
सिंधुदुर्गनगरी/ देवयानी वरसकर
एरवी राज्याला प्रकाशमय ठेवण्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यांनी यंदा संवेदनशीलतेने सामाजिक बांधिलकी जपत भावी पिढीच्या विद्युत सुरक्षेचा नवा अध्याय लिहिला. विद्यार्थ्यांमध्ये विद्युत सुरक्षा, हरित ऊर्जा आणि वीज बचतीबाबत जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने गेल्या पंधरवड्यात या अभियंत्यांनी राज्यातील तब्बल २ हजार ९१४ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सुमारे ६ लाख १९ हजार विद्यार्थ्यांचे सादरीकरण व थेट संवादाद्वारे प्रबोधन केले. या विशेष उपक्रमादरम्यान शैक्षणिक संकुलांमध्ये विद्युत सुरक्षेचे पोस्टर्स, फ्लेक्स आणि माहितीपत्रकांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्युत यंत्रणेविषयी योग्य माहिती नसल्याने राज्यात लहान मुले आणि विद्यार्थ्यांचे विद्युत अपघात होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून महावितरणकडून यंदा अभियंता दिन व गणेशोत्सवाचे औचित्य साधून विद्युत सुरक्षा व हरित ऊर्जा प्रबोधन अभियान राबविण्यात आले. यामध्ये विद्युत सुरक्षेचे चित्रमय सादरीकरण, माहितीपत्रके आणि विविध प्रात्यक्षिके यासह विजेची निर्मिती व तिचा प्रवास कसा होतो यासह ऊर्जा बचत आणि ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयासाठी भावी पिढीला हरित ऊर्जेचे महत्त्व समजून सांगण्यात आले.
राज्यभरात राबवण्यात आलेल्या या अभियानात कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक ९४६ शाळांमध्ये २ लाख १४ हजार विद्यार्थ्यांना, नागपूर प्रादेशिक विभागात ८९९ शाळांमध्ये १ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांना, पुणे प्रादेशिक विभागात ८२७ शाळांमध्ये १ लाख ६९ हजार विद्यार्थ्यांना आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात २४२ शाळांमध्ये ६५ हजार विद्यार्थ्यांना थेट संवादाच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेचे व हरित ऊर्जेची माहिती दिली.
विद्युत सुरक्षा व बचत आणि हरित ऊर्जेची पेरणी करणाऱ्या महावितरणच्या या उपक्रमाचे राज्यभरातील शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून जोरदार स्वागत करण्यात आले. महावितरणमधील अभियंत्यांच्या या सामाजिक संवेदनशीलतेमुळे राज्यात शून्य विद्युत अपघाताच्या दिशेने व विद्युत सुरक्षेच्या जागराचे एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे.


