सावंतवाडीत वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त, उबाठा शिवसेनेची वनविभागाकडे उपाययोजनेची मागणी
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी तालुक्यातील माठेवाडा, झिरंगे, नाईकवाडा, कावलेवाड आणि झिरंगे रोड परिसरात वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक श्री. देवेंद्र पांडुरंग टेंकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या भागामध्ये माकडे, गवे रेडे, सांबर आणि बिबट्या यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वन्यप्राण्यांकडून शेतीचे अतोनात नुकसान केले जात असून माकडांनी घरांची कवले फोडून शिजवलेले अन्न फस्त केल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच गवे रेडे आणि बिबट्याच्या वावरामुळे संध्याकाळनंतर रस्त्यावरून ये-जा करणे अत्यंत भीतीदायक बनले असून, नागरिकांवर शेती बंद करण्याची वेळ ओढवली आहे.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाने तातडीने पावले उचलावीत आणि सौरकुंपणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हे निवेदन सादर करताना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार श्री. वैभव नाईक, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख राजू शेटकर, संदीप वेंगुर्लेकर, नियाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.


