न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या वादात जनतेला वेठीस धरू नका: माजी नगराध्यक्ष संजू परब  

 

सिंधुदुर्ग  / राजू तावडे 

   सावंतवाडी नगरपरिषदेमध्ये सध्या धुमाकूळ पाहायला मिळत आहे. प्रशासन कसे चालवायचे याचे ज्ञान नसल्याने हे प्रकार घडत आहेत. नगरपरिषदेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा नगराध्यक्षांवर विश्वास नसल्याचे दिसून येत आहे. या दोघांच्या वादात सावंतवाडीचा सत्यानाश होणार आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी आपले वाद मिटवावे, जनतेला वेठीस धरू नये असा इशारा माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांनी दिला. मंगळवारी सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष श्री. परब म्हणाले, सावंतवाडीमध्ये नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांच्यामध्ये शितयुद्ध सुरू आहे. विशेष सभेत ‘थर्ड पार्टी ऑडिट’ हे समाधानकारक असल्याचा रिपोर्ट दिला होता. तेव्हा उपनगराध्यक्ष ऑनलाईन उपस्थित होते. जर ऑडीटर नव्हता तर तो विरोध त्याचवेळी उपनगराध्यक्षांनी का केला नाही? नगराध्यक्षांनी ऑडिटर नसताना सभा घेतली याचा अर्थ त्यांना ऑडिटर ची आवश्यकता वाटली नाही. ऑडीटवर नगराध्यक्षांचा विश्वास आहे असे वाटते. मात्र, नगराध्यक्षांवर उपनगराध्यक्षांचा विश्वास नाही म्हणून निरोडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. असा आरोप श्री. परब यांनी केला. नगराध्यक्ष आपल्या पदाला न्याय द्यायला कमी पडत आहेत असे उपनगराध्यक्षांच्या पत्रकार परिषदेमुळे दिसून येत आहे. नगराध्यक्षांवर यांचा विश्वास नसल्याचे स्पष्ट होत आहे असे श्री. परब म्हणाले.

नळ पाणीयोजनेचे काम बंद पडून योजना पूर्ण होऊन जनतेला पाणी मिळाले नाही तर त्याचा जाब आम्ही नगराध्यक्षांना विचारणार आहोत. काम बंद पडले तर खर्चाची किंमत दुप्पट होणार व भविष्यात शहराला पाणी मिळणार नाही. त्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी आपले वाद मिटवावेत, जनतेला वेठीस धरू नये. विशेष सभेत झालेला ठराव बदलता येतो का ? असाही सवाल त्यांनी नाव न घेता श्री. निरवडेकर यांना केला.

तसेच २८ कोटीच काम झाले की नाही ? हे सीओंना विचारा. अन्यथा, त्याची चौकशी लावावी, कोणी पैसे खाल्ले त्याची माहिती घ्यावी. नगरपरिषदेत सत्ताधारी ते आहेत आम्ही नाही. त्यामुळे काम पूर्ण न होता बिल का दिले ? हे तपासून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी पुढाकार घ्यावे असे आवाहन करत ही जबाबदारी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सत्ताधारी यांची असल्याचे श्री. परब यांनी सांगितले.

 

चौकट

मोती तलाव बचाव संघटना उभारणार

सावंतवाडीचा मानबिंदू असणाऱ्या मोती तलावात ड्रेनेजच पाणी सोडले जात आहे. यावर मी आवाज उठवल्यानंतर न.प. कडून दंडात्मक कारवाई संबंधितांवर करण्यात आली. मात्र, केवळ कारवाई करून सांडपाणी सोडण बंद होणार का ? असा सवाल त्यांनी केला. तसेच मोती तलाव वाचवण्यासाठी आपण सावंतवाडीतील नागरिकांची संघटना निर्माण करणार आहे. यातून तलाव स्वच्छतेसाठी पुढाकार घेणार असून सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षा नाहीत. हा तलाव वाचवण्यासाठी आम. दीपक केसरकर, निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेणार असल्याचे संजू परब यांनी स्पष्ट केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे