न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पारपोली दागिने चोरी प्रकरणी दोन संशयित ताब्यात, पोलिसांनी कुडाळातून उचलले 

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

     सावंतवाडी तालुक्यातील पारपोली येथे अंगाला मालिश करण्याचा बहाणा करून घरकाम करणाऱ्या महिलेच्या ६५ वर्षीय पतीची फसवणूक करत ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लांबवणाऱ्या दोन संशयितांना सावंतवाडी पोलिसांनी कुडाळ येथून ताब्यात घेतले. सुभाष प्रल्हाद चव्हाण (वय ३६) आणि संभाजी रामचंद्र चव्हाण (वय ५२, दोघे रा. रूपडी, हातकणंगले, कोल्हापूर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, दोन्ही संशयितांना सोमवारी २ नोव्हेंबर रोजी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सदरचा प्रकार २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास पारपोली गावठणवाडी येथे घडला होता. फिर्यादी रमेश केशव परब (वय ६५) हे आपल्या पत्नीसह घरी असताना दोन अज्ञात व्यक्ती काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून त्यांच्या घरी आले होते. त्यातील एकाने फिर्यादीला हातापायाचे मालिश करून देतो असे सांगून विश्वासात घेतले आणि पायाला मालिश करत गळ्यातील सोन्याची चैन काढून बाजूला ठेवायला सांगितली. त्यानंतर ते दोघेही व्यक्ती मोटारसायकलवरून निघून जाताना बाजूला काढून ठेवलेली सुमारे १० ग्रॅम वजनाची आणि ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन लबाडीने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे, पोलीस हवालदार शिंदे आणि पोलीस अंमलदार ९८३ यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मनीष शिंदे करत आहेत.

दरम्यान, पोलिसांनी आंबोली तसेच दाणोली बाजार व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयितांनी वापरलेली दुचाकी व वर्णनानुसार व्यक्ती दिसून आल्या.

त्यानंतर दुचाकीच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला असता, संबंधित व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथील असल्याचे निष्पन्न झाले. सावंतवाडी पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन कुटुंबाकडे चौकशी केली असता, ते कुडाळ येथे गेल्याचे समजले. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी कुडाळ येथील एका लॉजमधून दोघांनाही ताब्यात घेतले; मात्र त्यांच्याकडे चोरीचा मुद्देमाल सापडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन्ही संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे