ओंकार हत्तीचा पाय गांधील माशांच्या बिळावर पडला… खवळलेल्या माशांच्या हल्ल्यात दोन वनकर्मचारी जखमी
सिंधुदुर्ग राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावात गावात फिरणा-या ओंकार हत्तीवर गुरुवारी दुपारी गांजील माशांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात हत्तीच्या मागोमाग असलेल्या वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली याअसून त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ओंकार हत्तीने बुधवारी सायंकाळी ओटवणे गावातून मार्गक्रमण करत रात्री असनिये गाव गाठले होते. दाणोली-बांदा जिल्हा मार्ग ओलांडून भालावल व तांबोळी गावातून तो असनिये येथे दाखल झाला. या परिसरात त्याने रात्री मुक्काम केला. गुरुवारी सकाळी पुन्हा मागे फिरत दुपारी कोनशी येथील माऊली मंदिर परिसरात तो दाखल झाला.
त्यानंतर जंगलातून असनियेच्या दिशेने जात असताना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ओंकार हत्तीचा पाय जमिनीतील गांजील माशांच्या बिळावर पडला. त्यामुळे हजारो गांजील माशांनी अचानक हल्ला चढविला. हत्तीच्या मागोमाग असलेल्या वन कर्मचाऱ्यांनाही या माशांनी लक्ष्य केले. काही क्षणांतच हजारो माशा परिसरात पसरल्याने वन कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली.
माशांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी जंगलातून धाव घेत सुरक्षित ठिकाण गाठले. मात्र, या हल्ल्यात दोन वनकर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे ओंकार हत्तीच्या मागोमाग जंगलात वावरणाऱ्या वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


