मोकाट गाईंनी घेतला मृत्यू ….नांदगाव येथील अपघातात ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांचे निधन
सिंधुदुर्ग/ प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव फाटा ब्रिजवर गाय आडवी आल्याने झालेल्या कारच्या अपघातात ज्येष्ठ कवियत्री प्रा. डॉ. शरयू आसोलकर, वय ५९ वर्षे यांचे निधन झाले. आज सोमवारी सकाळी हा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार कवियत्री प्रा. डॉ. शरयू आसोलकर व त्यांचे भाऊ वैभव कृष्णा आसोलकर वय ४६ वर्षे हे रत्नागिरी वरून सावंतवाडी याठिकाणी जाण्यासाठी आपल्याला इनोव्हा क्रिस्टा कार क्र. एम एच ०७-ए जी ६३७२ ने निघाले होते.कार वैभव असोलकर चालवत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान सदर कार आज सकाळी ७.३० च्या दरम्याने नांदगाव ओटव फाटा येथील ब्रिज वर आली असता अचानक रस्त्यावर गाय आडवी आल्याने गाय ला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील ताबा सुटून सदर कार सिमेंट कठडा असलेल्या दुभाजकाला धडकून भीषण अपघात घडला.
अपघात घडल्याचे समजतात तेथे नागरिक जमा झाले. त्यांनी श्री. नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून तातडीने गंभीर जखमी झालेल्या डॉ. शरयू असोलकर यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्यांचे कणकवली रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर जखमी असलेले कारचालक वैभव कृष्णा आसोलकर यांना नांदगाव केंद्राच्या रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
डॉ. शरयू असोलकर या संत राऊळ महाराज महाविद्याल, कुडाळ येथे प्राध्यापिका होत्या. सावंतवाडी येथील माठेवाडा येथे त्यांचे वास्तव्य होते.


