न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

जहाज बांधणी, बंदर विकासासाठी सिंधुदुर्गात कौशल्य प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू करणार : मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग राजू तावडे

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जहाज बांधणी उद्योग आणि दिघी बंदर विकासाच्या माध्यमातून भविष्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या संधींचा लाभ स्थानिक युवक-युवतींना मिळावा, यासाठी जिल्ह्यात प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) ‘मरीन इंजिन फिटर’ आणि ‘मरीन फिटर’ हे दोन नवीन ट्रेड सुरू करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करा, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते. जहाज बांधणी आणि बंदर विकासाशी संबंधित उद्योगांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. ही गरज लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये हे दोन नवीन ट्रेड सुरू करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी शासनाची मान्यता मिळविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळाले पाहिजे. जिल्ह्यातील आठ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून याच वर्षी हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

या अभ्यासक्रमांमुळे प्रशिक्षित युवक-युवतींना खासगी व सरकारी शिपयार्ड, बंदरे, मर्चंट नेव्ही, ऑइल आणि गॅस प्रकल्प अशा विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळे जहाज बांधणी आणि सागरी क्षेत्रातील भविष्यातील रोजगाराची गरज लक्षात घेऊन हे अभ्यासक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत.

याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध अल्पमुदतीचे (शॉर्ट टर्म) अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतही पालकमंत्र्यांनी सूचना केल्या. स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन पर्यटन क्षेत्रातील रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात इलेक्ट्रिशन ची गरज असून आणखी काही औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये अभ्यासक्रम सुरू करावेत अशाही सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिकारी प्रतिभा चव्हाण, भूषण सोनवडेकर आणि भाजप नेते सतीश सावंत उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे