न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 20, 2026

बातमी जशी आहे तशी

कोकणचा ‘दर्या’ झळकणार इफ्फीच्या मंचावर.

 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ आणि सागरेश्वर परिसरात संपूर्ण चित्रीकरण झालेल्या ‘दर्या’ या लघुपटाची ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) निवड झाली आहे. इफ्फीच्या ‘द गोवन डिरेक्टर कट’ या विशेष विभागात या लघुपटाला स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, या लघुपटातील सर्व कलाकार स्थानिक असून, बहुतांश कलाकारांनी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर अभिनय केला आहे. सेरेब्रल पाल्सी झालेल्या मुलाचे आयुष्य, त्याचे भावविश्व आणि त्याच्याशी जोडलेल्या नात्यांमधील भावनिक पैलू या लघुपटात मांडण्यात आले आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षण मंडळाने निवडलेल्या १२ गोमंतकीय चित्रपटांची यादी जाहीर केली. या यादीत ‘दर्या’ या किशोर अर्जुन लिखित आणि दिग्दर्शित लघुपटाचाही समावेश आहे. ‘द गोवन डिरेक्टर कट’ या विशेष विभागातील निवडीमुळे सिंधुदुर्गातील स्थानिक कलाकारांनी साकारलेल्या या कलाकृतीला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्थान मिळाले आहे.
परवेझ मोमीन यांच्या ‘मोमीन अँड सन्स चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशन’ने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून या लघुपटाची निर्मिती केली आहे. मधुसूदन मर्टल यांनी या लघुपटाची कार्यकारी निर्मिती केली असून, कुडाळ येथील माऊली सेवा संस्थेने निर्मितीस सहकार्य केले आहे. नीरज पाटील यांनी या लघुपटाचे छायाचित्रण केले असून राकेश केशवन या मल्याळम सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध युवा संगीतकाराने संगीत दिले आहे. तर भावेश फुलारी यांनी ध्वनी संयोजन केले आहे.
लघुपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन किशोर अर्जुन यांचे आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला हा सलग तिसरा, तर लेखक म्हणून सलग सातवा चित्रपट इफ्फिमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यांच्या यापूर्वीच्या चित्रपटांची इफ्फिसह देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये निवड झाली असून, काही सिनेकृतींना महत्वाचे पुरस्कार देखील लाभले आहेत.
या लघुपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यातील नातू आणि आजोबांची भूमिका साकारणारे शिवांश आणि जयप्रकाश सावंत हे खऱ्या आयुष्यातही नातू आणि आजोबा आहेत. त्यामुळे पडद्यावर साकारलेल्या या नात्याला वास्तवाचा भावनिक स्पर्श लाभला आहे. श्री जयप्रकाश सावंत सावंत हे नाट्यअभिनेते व नाट्य दिग्दर्शक असून त्यांनी अनेक सामाजिक नाटकांचे दिग्दर्शन केलेले आहे व भूमिकाही साकार केलेल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी या संस्थेच्या कार्यकारणी सदस्यपदी ते काम करतात. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त लखमसावंत भोंसले तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
त्यांच्यासह जानकी नाईक, विकास कासलीवाल आणि मधुसूदन मर्टल यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. मुख्य कलाकारांसह इतर सहकलाकारांनीही या लघुपटातून पहिल्यांदाच अभिनय केला आहे. या सर्वांना आता इफ्फीसारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात आपली कलाकृती सादर करण्याची संधी मिळणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे