नदीत कार कोसळून सहा जणांचा मृत्यू
पटना/ वृत्तसंस्था
बिहारमधील अररिया जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. लग्न ठरवण्याच्या समारंभातून घरी परतणाऱ्या ६ जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. प्रवासादरम्यान कार थेट नदीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीला सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. या अपघातामुळे मृतांच्या गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. सुपौल जिल्ह्यातील पिपरा परिसरातून काही जण सिकटी येथील भपटिया गावात लग्न ठरवण्यासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण कारमधून आपल्या घरी परतत होते. याचवेळी ताराबाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीडी पुलाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार पुलाचा कठडा तोडून थेट मरिया नदीत कोसळली.यात सहा जणांचा बुडून मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आले आहे.


