कोलझरमध्ये तक्रारदारांनाच बजावल्या नोटीसा, महसूलचा उरफाटा कारभार
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
कोलझर येथे महसूल पथकासमोर ज्या जमिन मालकांनी आपल्या क्षेत्रात अतिक्रमण व अवैध उत्खनन केल्याची तक्रार केली त्यांनाच नोटीसा पाठविण्याचा उरफाटा कारभार दोडामार्ग येथील महसूल विभागाने केला आहे. ज्यांची तक्रार आहे, त्यांनाच नोटीसा पाठविण्यामागचे महसूल कारभाराचे गौडबंगाल काय? असा सवाल आता येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. दिल्ली लॉबीने कोणत्याही मार्गाने स्थानिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याला भीक घालणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
तालुक्यात पाय पसरलेल्या दिल्ली लॉबीच्या विरोधात कोलझर ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी गावातील जमिनी विकणार नाही, अशी शपथ ग्रामदैवतासमोर घेतली होती. त्या गावातील काही जमिनींची अलिकडे विक्री झाली होती. ही जागा गावच्या डोंगरातील दाट जंगल असलेल्या भागात आहे. त्या सर्व्हे नंबर पर्यंत जाणारे सुमारे ४ किलोमीटर लांब इतके उत्खनन स्थानिकांना अंधारात ठेवून करण्यात आले होते. यातील खनिजयुक्त मातीच्या चोरीबरोबरच इकोसेन्सिटीव्ह एरिया असलेल्या या भागात वृक्षतोड करण्यात आली होती. कोलझरवासियांनी एकत्र येत हा प्रकार बंद पडला. यानंतर दोडामार्ग महसूल विभागातर्फे एका पथकाने या सगळ्याचा पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थांनी व जमिन मालकांनी हे अतिक्रमण नव्याने जमिन खरेदी केलेल्या लोकांनी केले आहे. आमच्या जमिनीत घुसून खनिजयुक्त मातीची चोरी तसेच वृक्षतोड केली असल्याचे जबाब देत तक्रार केली होती. याचे रेकॉर्डींगही करण्यात आले होते. असे असूनही दोडामार्ग महसूल विभागातर्फे तहसिलदार राहुल गुरव यांच्या सहीने ज्यांनी तक्रार केली आणि जबाबात अतिक्रमण झाल्याचे म्हणणे दिले, अशा २६ जणांना उलट नोटीस बजावली आहे.
या नोटीसीत म्हटले आहे की, कोलझर येथील सर्व्हे नं. ४४ मध्ये विना परवाना माती उत्खनन करून त्याची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले आहे. याविषयी तळकट ग्राम महसूल अधिकारी यांनी अहवाल सादर केलेला आहे. याची मोजमापे घेतली असून महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियमानुसार उत्खननाबाबत दंडात्मक कारवाई का करण्यात येवू नये याचे म्हणणे ७ दिवसात कार्यालयात सादर करावे, असे यात नमुद आहे. दोडामार्ग महसूलच्या या उलट्या भुमिकेबाबत कोलझरमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.


