बुलढाण्यात एकाच कुटुंबातील तीन जण बेपत्ता… जिल्ह्यातील एकाच दिवशी आठ बेपत्ता
बुलढाणा/ सचिन व्यवहारे
बुलढाणामधील मलकापूर शहरातून उच्चभ्रू परिवारातील तीन जण संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील ३२ वर्षीय आई, ११ वर्षीय मुलगी आणि ८ वर्षीय मुलाचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली असून हे तिघे कुठे बेपत्ता झाले याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली आहे.
मलकापूर शहरातील हनुमान नगर परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत पटेल कुटुंब राहतं. वसंत कुमार पटेल यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी मित्तल पटेल, मुलगी सिया पटेल व मुलगा देवांश पटेल हे बाजारपेठेत गेले होते. मात्र बराच वेळ होऊन देखील ते परत न आल्याने पटेल भयभीत झाले.
त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात रहस्यमय रित्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.याप्रकरणी पोलिसांनी तातडीने शोध कार्य सुरु केले आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून एकाच दिवसात पटेल परिवाराच्या सदस्यांसह एकूण सात जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसांना विविध पोलीस स्थानकात प्राप्त झाल्या आहेत. अचानक बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.


