सावंतवाडी तालुक्यात ९ जि. प. मतदारसंघांपैकी ५ ठिकाणी भाजप विजयी….. बांदा पंचायत समितीत भाजपच्या वर्चस्वाला सुरूंग
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी तालुक्यात ९ जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी ५ ठिकाणी भाजपचे कमळ फुलले आहे तर शिवसेनेचा एक उमेदवार विजयी झाला. इतर ठिकाणी बंडखोर अपक्षांनी बाजी मारत भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांना पराभवाचा ‘नारळ ‘ दिला.
पंचायत समितीच्या १८ सदस्यांपैकी भाजप अन् शिवसेना ६-६, उबाठा शिवसेनेला एका जागी तर ५ ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले. यात बांदा पंचायत समितीत भाजपच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सुरूंग लागला. तर आरक्षित असलेल्या प्रभागात विजय संपादन करून शिवसेनेन सभापतीपदी आपल्याकडे राखले आहे.
जिल्हा परिषदच्या माडखोल मतदारसंघात ४ हजार ३२७ मत घेत अपक्ष उमेदवार शिवानी नाईक विजयी झाल्या. भाजपच्या सुप्रिया मडगावकर यांना ३ हजार ४८० मते पडली. ८४७ मतांनी नाईक यांनी भाजपचा पराभव केला. आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या शोभा गावडे यांना ४ हजार ३९६ तर शिवसेनेच्या सुप्रिया गावडेंना ४ हजार ९७ मत पडली. सेनेच्या उमेदवाराचा २९६ मतांनी भाजपने पराभव केला.
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे बंडखोर अपक्ष मायकल डिसोजा विजयी झाले. भाजपच्या महेश सारंग यांचा त्यांनी ३३६ मतांनी पराभव केला. श्री. डिसोजा यांना ४ हजार २१४ मते मिळाली तर श्री. सारंग यांना ३८७८ मत मिळाली.
चर्चेत राहिलेल्या तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या संदिप गावडे यांनी उबाठा शिवसेनेच्या रूपेश राऊळ यांचा तब्बल २ हजार ५२६ मतांनी पराभव केला.
माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या विक्रांत सावंत यांनी ३ हजार ४७३ एवढे मताधिक्य घेत विजय प्राप्त केला. तालुक्यातील सर्वाधिक लीड मिळवण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांना तब्बल ५ हजार १४१ तर उबाठा शिवसेनेच्या दिनेश सावंत यांना १ हजार ६६५ मते पडली.
इन्सुली जि. प. मतदार संघात शिवसेनेच्या झेवियर फर्नांडिस यांना पराभव झाला. अपक्ष नितीन राऊळ यांनी त्यांचा १ हजार १०४ मतांनी पराभव केला. श्री. राऊळ यांना ३ हजार ८६४ तर झेवियर फर्नांडिस यांना २ हजार ७६० तर अपक्ष उमेदवार स्वागत नाटेकर यांना ५२९ मते पडली.
मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या अपर्णा सातोसकर ४ हजार ५६९ मत घेत विजयी झाल्या. त्यांना १ हजार ३२३ एवढं मताधिक्य मिळाले. शिवसेनेच्या प्रियांका नारोजी यांना ३ हजार २४६ मते प्राप्त झाली.
आरोंदा मतदारसंघातून शिवसेनेच्या सुदन कवठणकर विजयी झाले. त्यांना ३ हजार ३८६ तर अपक्ष शर्वाणी गांवकर यांना २ हजार ३४५ मते पडली. बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपचे प्रमोद कामत यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
पंचायत समिती माखडोल मतदारसंघात अपक्ष अवनी राऊळ यांनी भाजपच्या अनिता राऊळ यांचा ७०४ मतांनी पराभव केला. कलंबिस्त मतदारसंघात अपक्ष प्रथमेश सावंत यांनी शिवसेनेच्या रमाकांत राऊळ यांना १ हजार १९६ मतांनी पराभूत केले. आंबोलीत शिवसेनेच्या मायकल डिसोजा यांनी भाजपच्या शशिकांत गावडे यांचा ४१७ मतांनी पराभव केला. विलवडेत भाजपचे प्रभाकर सुकी विजयी झाले. शिवसेनेच्या दिनानाथ कशाळकर यांचा त्यांनी ५५० मतांनी पराभव केला. कोलगावात शिवसेनेच्या प्रणाली टिळवे यांनी १११ मतांनी भाजपच्या संध्या हळदणकर यांना पराभूत केल. कारिवडेतून २७७ च्या मताधिक्याने भाजपच्या प्राजक्ता केळुसकर विजयी झाल्या. तळवडेतून उबाठा शिवसेनेच्या श्वेता जाधव यांचा ६२८ मतांनी पराभव करत शिवसेनेच्या सुस्मिता जाधव विजयी ठरल्या. सभापती पदासाठी आरक्षित मतदारसंघ असल्याने त्यांची सभापती वर्णी लागणार आहे. मळगावमध्ये भाजपचे गौरव मुळीक ८३२ मतांनी विजयी झाले. माजगावात भाजप अपक्ष उमेदवार जितेंद्र गांवकर ९७१ मतांनी विजयी झाले.
चराठे येथे शिवसेनेच्या उत्कर्षा गांवकर ८३२ मतांनी विजयी झाल्या. इन्सुलीत अपक्ष सदाशिव राणे ८८३ मतांनी विजयी झाले. मळेवाड मधून भाजपच्या धनश्री मराठे यांनी तब्बल १ हजार ७६० मतांच मताधिक्य मिळवत यश संपादन केले. पंचायत समितीत सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा मान त्यांना मिळाला. न्हावेलीत शिवसेनेचे शरद धाऊसकर विजयी झाले. आरोंदा येथे भाजपच्या नेहा कांबळी विजयी झाल्या. सातार्डेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उदय पारिपत्ये ४३४ मतांनी विजयी झाले.
बांदा येथे अपक्ष उमेदवार ऋतिका नाईक यांनी भाजपच्या रूपाली शिरसाट यांचा ३८२ मतांनी पराभव केला. भाजपचा ३५ वर्षांचा गड अपक्ष म्हणून त्यांनी नेस्तनाबूत केला. तांबोळीतून शिवसेनेच्या प्रियांका देसाई ७९८ मतांनी विजयी झाल्या.


