नगरपरिषदेच्या समाजकल्याण व ज्येष्ठ नागरिक कल्याण सभापतीपदी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर … आरोग्य व क्रीडा सभापतीपदी सुधीर आडीवरेकर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडी नगरपरिषदेच्या समाजकल्याण व ज्येष्ठ नागरिक कल्याण सभापतीपदी आज बुधवारी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची निवड करण्यात आली, तर आरोग्य व क्रीडा सभापतीपदी सुधीर आडीवरेकर यांची निवड करण्यात आली.
तसेच नियोजन जलनिःसारण व पर्यावरण समिती सभापतीपदी आनंद नेवगी, पाणी पुरवठा समिती सभापतीपदी प्रतिक बांदेकर, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी दिपाली भालेकर, उद्यान व पर्यटन समिती सभापतीपदी मोहीनी मडगावकर यांची निवड करण्यात आली. तर महिला बालकल्याण उपसभापती पदी सुनिता पेडणेकर यांना संधी देण्यात आली आहे.
भाजपसह शिवसेना, कॉग्रेस व उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांना समितीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. स्थायी समिती सभापती पदसिद्ध सभापती नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, सदस्य म्हणून उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सदस्य म्हणून नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, प्रतिक बांदेकर, दिपाली भालेकर, मोहीनी मडगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या बाबु कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, स्नेहा नाईक, ॲड. सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, ॲड. निता सावंत-कविटकर यांचा समितीच्या सदस्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. कॉग्रेसचे तौकीर शेख व उबाठा शिवसेनेचे देवा टेमकर यांनाही विषय समिती सदस्यपदी संधी देण्यात आली आहे.
तर आरोग्य व क्रीडा समितीमध्ये सदस्य म्हणून नगरसेविका निलम नाईक, वीणा जाधव, नगरसेवक देव्या सुर्याजी, ॲड. सायली दुभाषी यांचा समावेश आहे.


