कोंकणात आज उष्णतेचा यलो ॲलर्ट.. रायगड, रत्नागिरीत पारा वाढणार
मुंबई/ वृत्तसंस्था
राज्यभरात आता हिवाळ्याकडून उन्हाळ्याच्या दिशेने ऋतुबदलाला सुरुवात झाली आहे. वाऱ्यांची दिशाही बदलत असून, तापमानामध्ये चढ-उतार अनुभवायला मिळत आहेत. भारतीय हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आज, सोमवारी तुरळक ठिकाणी उष्मा आणि आर्द्रतापूर्ण वातावरणाचा ‘यलो ॲलर्ट’ दिला आहे. राज्यात दिवसभरात मुंबईत सांताक्रूझ येथे सर्वाधिक कमाल तापमान नोंदले गेले.
रत्नागिरीमध्ये रविवारी ३४.७ अंश से. कमाल तापमान नोंदले गेले. ते सरासरीपेक्षा ३.१ अंश अधिक होते. हर्णे येथे तापमानाचा पारा फारसा चढा नव्हता, मात्र येथे सकाळी ९७ टक्के, तर संध्याकाळी ७७ टक्के आर्द्रता नोंदली गेली. मुंबईतही कुलाबा येथे ९१, तर सांताक्रूझ येथे ८१ टक्के आर्द्रता रविवारी नोंदली गेली. मुंबईमध्ये दुपारनंतर आर्द्रतेचे प्रमाण कमी होते; परंतु पारा चढला होता.सांताक्रूझ येथे ३५.२ अंश से., तर कुलाबा येथे ३३ अंश से. कमाल तापमान नोंदले गेले. हे सरासरीपेक्षा अनुक्रमे ३.६ आणि २.८ अंशांनी अधिक होते.


