राज्यस्तरीय “दिपस्तंभ २०२५” पुरस्कार सावंतवाडी कॅथॉलिक पतसंस्थेला प्रदान
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय “दिपस्तंभ २०२५” पुरस्कर आज कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेला प्रदान करण्यात आला. संपुर्ण कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्हातील हा मान मिळवणारी कॅथॉलिक सोसायटी एकमेव संस्था ठरली आहे. महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीमध्ये दिपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार कॅथॉलिक सोसायटीला प्रदान करण्यात आला.
आज मंगळवारी आर्यन रिव्हरवुड रिसॉर्ट, भोर, पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्याच्या राज्यव्यापी समारंभात श्री. सतिश मराठे, संचालक- भारतीय रिझर्व्ह बँक व श्री. उदय जोशी, राष्ट्रीय अध्यक्ष सहकार भारती, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष श्री. ओमप्रकाश दादाप्या तथा काका कोयटे या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार कॅथॉलिक पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमती आनमारी डिसोजा यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका श्रीम. मार्सेलिन डिसोजा, संचालक श्री. जॉनी फेराव तसेच सरव्यवस्थापक श्री. जेम्स बॉर्जिस उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्ष आनमारी डिसोजा म्हणाल्या, संस्थेने आजपर्यंत व्यवसायाची कटिबध्दता राखत सहकारातील कार्याची अखंडता कायम राखली आहे. संस्थेच्या पारदर्शक कारभारामुळे जिल्हावासीयांच्या मनात संस्थेबद्दल एक विश्वासाचे नाते तयार झाले आहे. संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत संस्थेचे सभासद, ग्राहक, संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.


