मराठी भाषा गौरव दिनानिम्मित्त” स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये ग्रंथदिंडी
सिंधुदुर्ग /राजू तावडे
कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा- सावंतवाडी व स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल त्यांनी मिळून आज शुक्रवारी ”मराठी भाषा गौरव दिन” कार्यक्रम मोठ्या उत्साहात कोलगाव येथे साजरा केला. या निमित्ताने स्टेपिंग स्टोन स्कूलच्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते. यावेळी चिमुकल्यांनी वेशभूषा धारण करत महाराष्ट्रातील संत परंपरेचा जागर केला.
कोमसापचे ज्येष्ठ सदस्य प्रा. सुभाष गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथदिंडीस प्रारंभ करण्यात आला. स्टेपिंग स्टोन स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ग्रंथाच पूजन करण्यात आले. यावेळी सहभागी चिमुकल्यांनी माझी आई, माझी मराठी, मराठी भाषा चिरायु होवो !, मराठीचा अभिमान, महाराष्ट्राची शान, जपूया मराठी भाषा, वाढवूया तिची अभिमान आशा घोषणा देत आसमंत दुमदुमून सोडले. ग्रंथदिंडीतून महाराष्ट्रातील संत व वारकरी परंपरेचा जागर करण्यात आला. यामध्ये चिमुकल्यांनी संत तुकाराम, संत एकनाथ, स्वामी विवेकानंद, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत कान्होपात्रा, संत सोयराबाई, संत सोहिरोबानाथ आंबिये आदींसह वारकरी वेश धारण केला होता. या ग्रंथदिंडीचे हे खास आकर्षण ठरले. यानंतर ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकर्ईकर यांच्या हस्ते बाल साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकर्ईकर, कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव विनायक गांवस, मुख्याध्यापिका प्राची साळगावकर, प्रा. सुभाष गोवेकर, ॲड. नकुल पार्सेकर, मेघना राऊळ, मंगल नाईक-जोशी, स्टेपिंग स्टोन समन्वयक सुषमा पालव, डॉ. भक्ती तावडे-गांवस, मराठी विभाग प्रमुख चैताली वेर्लेकर, मराठी शिक्षक मिनानाथ वारंग आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.


