न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे…. कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

मराठी हि छत्रपती शिवाजी महाराजांची, संत महंतांची भाषा आहे. ही भाषा टिकवण्यासाठी आपण अधिक मेहनत घेतली पाहिजे.
आपली मातृभाषा मराठी हि आई आहे. मुंबई सारख्या शहरात काही प्रकार पहाता आपली भाषा हरवली आहे की काय ? असा प्रश्न पडतो. मात्र, आज या इंग्रजी शाळेत झालेला मराठी भाषेचा गौरव बघता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत देखील मराठी भाषा रूजलेली आहे याचा आनंद झाला, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी व स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवारी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव येथील ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. मसके बोलत होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कुसुमाग्रज वि.वा.‌ शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. प्रशालेच्यावतीने रोप देऊन उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मालवणी कवी दादा मडकर्ईकर, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक ॲड.रूजूल पाटणकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच मराठी विषयात विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या या शाळेची विद्यार्थिनी मनवा साळगावकर हिचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकर्ईकर, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक ॲड. रूजूल पाटणकर, कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, कोमसाप सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव विनायक गांवस, ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. सुभाष गोवेकर, मेघना राऊळ, मंगल नाईक-जोशी, संतोष पवार, रामदास पारकर,मुख्याध्यापिका प्राची साळगावकर, डॉ. भक्ती तावडे-गांवस, वैभककुमार पारकर, स्टेपिंग स्टोन समन्वयक सुषमा पालव, ग्रिष्मा सावंत, शेफाली तेंडोलकर, निधी सावंत, चैताली वेर्लेकर, अमृता सावंत, प्रगती तेजम, कनिका राजपुरोहित, मेहविश बेग, सुझेन शेख, दिपीका कोरे, कपिल कांबळे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालवणी कवी दादा मडकर्ईकर यांनी ‘उठा उठा चिऊताई ‘ हि व मालवणी कविता सादर करत कार्यक्रमाला सुरुवात केली. यानंतर पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपली सादरीकरण केली. यामध्ये कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर, केशवसुत कृष्णाजी केशव दामले, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर, आरती प्रभू चिं.त्र्य. खानोलकर, कवयित्री शांता शेळकेंपासून ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, कादंबरीकार शिवाजी सावंत आदींसह थोर साहित्यिकांची माहिती चिमुकल्यांनी आपल्या भाषणातून दिली‌. तसेच काव्य वाचन, स्वरीत कवितांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गौरव केला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना कोमसाप सावंतवाडीचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर म्हणाले, मुलांना व्यासपीठ मिळावे, त्यांनी मायबोलीतून संवाद साधावा यासाठी आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुलांनी सादर केलेली भाषण, काव्य बघता आमचा हा उद्देश सफल झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख चैताली वेर्लेकर यांनी केलं. सूत्रसंचालन मिनानाथ वारंग यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका प्राची साळगावकर यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे