न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी न.पा.चा जवळपास १५० कोटींचा अर्थसंकल्प सादर

सिंधुदुर्ग/

सावंतवाडी नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा बहुचर्चित अर्थसंकल्प शुक्रवारी सभागृहात सादर करण्यात आला. प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी अर्थसंकल्प मांडताना “नागरिकांवर कोणताही नव्या करांचा बोजा न टाकता विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे,” असे ठामपणे सांगितले. तब्बल आठ वर्षांनंतर लोकनियुक्त प्रतिनिधींमार्फत अर्थसंकल्प सादर झाल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.या अर्थसंकल्पात एकूण १४९ कोटी ९९ लाख ७२ हजार ८७३ रुपयांची जमा तर ९३ कोटी ५० लाख १४ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याचबरोबर सन २०२५-२६ या वर्षाचे सुधारित अंदाजपत्रकही सभागृहासमोर मांडण्यात आले.अर्थसंकल्प सादर होताच सभागृहात सविस्तर चर्चा रंगली. विरोधी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक संजु परब यांनी महसुली वाढ, कर वसुली, भांडवली प्रकल्पांची अंमलबजावणी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. त्यांनी विविध तरतुदीवर आक्षेप घेतला आणि प्रशासनाला जाब विचारला. रस्ते ,अग्निशमन , निवडणूक खर्च ,झेरॉक्स खर्च , पाण्यासाठीच्या तरतुदींवरील खर्च या संदर्भात त्यांनी आक्षेप घेतला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत चर्चेत सक्रिय सहभाग घेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले

शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ८० कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाची भुयारी गटर योजना राबविण्याची घोषणा प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी केली.या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोथान महाभियानांतर्गत प्रस्ताव सादर केला जाणार असून २०२६-२७ साठी २० कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आली आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याची तरतूदही करण्यात आली आहे.यावेळी संजु परब यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने त्यांच्या भेटीची सूचना केली. त्यावर निरवडेकर यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच शिंदे यांची सर्व नगरसेवकांनी एकत्रित भेट घ्यावी, असे सुचवले.

सावंतवाडी नगरपरिषदेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प पायाभूत सुविधा, पर्यटन, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सामाजिक कल्याण यांवर केंद्रित आहे. ८० कोटींची भुयारी गटर योजना, २४ तास पाणीपुरवठा, मोती तलाव सुशोभीकरण आणि क्रीडा सुविधा उन्नती हे प्रमुख ठळक मुद्दे ठरले आहेत.तथापि, महसुली वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करणे, कर वसुली १००% साध्य करणे आणि जाहीर केलेल्या योजनांची वेळेत अंमलबजावणी करणे ही मोठी आव्हाने असणार आहेत. शहरवासीयांच्या अपेक्षा वाढलेल्या असताना हा अर्थसंकल्प प्रत्यक्षात कितपत उतरतो, हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे. सावंतवाडी शहर विकासाच्या नव्या टप्प्याकडे वाटचाल करण्याच्या तयारीत आहे. आजच्या अर्थसंकल्पीय चर्चेत विरोधी गटनेते बाबू कुडतरकर सत्ताधारी आनंद नेवगी काँग्रेसचे तौकीर शेख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे देवा टेमकर यांनी सहभाग दर्शवला सभेला नगरसेविका दिपाली भालेकर, सायली दुभाषी, नीलम नाईक ,सुकन्या टोपले ,दुलारी रांगणेकर , देव्या सूर्याजी, सुनिता पेडणेकर, बाबू कुडतरकर , आनंद नेवगी , मोहिनी मडगावकर , आदी उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे