विकासाचे व्हिजनवाले गायब, नाहीतर रस्त्यावर उतरू, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावर कोणाचेही नियंत्रण नाही. पाणीपुरवठा योजनेवर कुठलाही तज्ञ अधिकारी अद्याप पर्यंत नेमलेला नाही. यासाठी मी विरोध केला होता मात्र हे काम तसेच चालू आहे. त्याचप्रमाणे गॅस पाईप लाईन मुळे संपूर्ण शहरात धुरळा पसरला असून त्याचा नाहक त्रास नागरिकांना भोगाव लागत आहे. आठ दिवसात यावर तोडगा निघाला नाही तर मी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करीन, असा इशारा माजी नगराध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी विकासाच्या गोष्टी सांगणारे, विकासाचे व्हिजनवाले सध्या गायब आहेत. विकास कसा करावा हे शिकायला सताधाऱ्यांना अजून दोन वर्ष लागतील, अशी टीका संजू परब यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे लवकरच आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गॅस पाईपलाईन व पाणीपुरवठा योजनेच्या चुकीच्या कामाबाबत बाबत कारवाई करण्यास भाग पाडीन असा इशारा परब यांनी दिला.
शहरात सुरू असणाऱ्या गॅस पाइपलाईनमुळे शहरवासीयांना धुळ खावी लागत आहे. जोपर्यंत टेंडर निघत नाही तोपर्यंत हे काम थांबवाव अशी आमची मागणी आहे. त्यामुळे शहरवासीयांना त्रास होणार नाही. हे काम न थांबवल्यास कोणी कुठे कुठे बैठका घेतल्या ? ते नावानिशी जाहीर करेन असा इशारा देखील श्री. परब यांनी दिला. यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी, प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते.


