ॲड. सरोदे यांच्या ज्ञानाची आम्हाला आवश्यकता नाही, ॲड. परिमल नाईक
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाची निवडणूक २४ मार्चला होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. असीम सरोदे हे सावंतवाडी बार रूममध्ये व्याख्यानाच्या नावाखाली विद्यमान बार कौन्सिलच्या सभासदांवर तथ्यहीन टिपणी करून, बेशुट आरोप करण्याची शक्यता होती. त्यामुळे शांततेचा भंग होण्याची शक्यता असल्यामुळेच त्याची कल्पना पोलिसांना देण्यात आली. ॲड. सरोदे यांच्या ज्ञानाची आम्हाला आवश्यकता नाही. कोणाच्याही ज्ञानाचे तारे येथे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आज मंगळवारी सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी दिला.
सोमवारी ॲड. असीम सरोदे यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या निवडणूक पार्श्वभूमीवर बार असोसिएशन व वकील सभासदांवर आरोप केले होते. या आरोपाचे खंडन करण्यासाठी आज बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सावंतवाडी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रणशूर, ॲड.संदीप निंबाळकर, ॲड. शामराव सावंत व इतर वकील मंडळी यावेळी उपस्थित होती.
ॲड. परीमल नाईक पुढे म्हणाले, असीम सरोदे यांनी बार कौन्सिलने कोणतेही कार्य केले नाही असा आरोप केला आहे. मात्र कोल्हापूर येथे सर्किट बेंच उभारणीमध्ये निवृत्त सरन्यायाधीश श्री. भूषण गवई यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र बार कौन्सिलच्या 25 सदस्यांनी या मागणीला पाठिंबा दिला आणि समन्वयक म्हणून ॲड. संग्राम देसाई यांची नियुक्ती केली. संग्राम देसाई यांनी यासाठी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात सातत्याने पाठपुरावा केला. हे कार्यालय पूर्ण होण्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली, असे नाईक म्हणाले. त्याचप्रमाणे वकिलांसाठी तळोजा येथे होत असलेल्या रिसर्ज सेंटर उभारणीसाठी संग्राम देसाई यांची महत्त्वाची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ॲड. रणशूर म्हणाले, माझा व असीम सरोदे यांच्या याविषयी काही संवाद झाला नाही. ॲड. किशोर वरक यांनी असीम सरोदे व मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तानाजी नलवडे यांची ‘ बार कौन्सिल इलेक्शन मध्ये मतदारांची भूमिका व उच्च न्यायालयातील प्रॅक्टिस ‘ या विषयावर आपणास व्याख्यान द्यावयाचे आहे. व्याख्यानासाठी सावंतवाडी बार रूममध्ये परवानगी मिळाली अशी मागणी केली. याबाबत कार्यकारी मंडळ व सभासदांशी चर्चा करून सांगतो असे मी सांगितले. मात्र यामागे वकीलांना प्रबोधन करणे हा हेतू नसून निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सर्व सहमतीने दिलेल्या उमेदवारा विरुद्ध प्रचार करणे हा हेतू असल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवू नये म्हणून आम्ही सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे लेखी अर्ज दिल्याचे ॲड. रणशूर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ॲड. संदीप निंबाळकर म्हणाले, निर्भय बनो या चळवळीत असीम सरोदे व आम्ही एकत्र असतो. मात्र गुन्हेगारी स्वरूपाची माणसे या चळवळीत घेऊ नका असे मी सरोदे यांना सुचित केले होते. फसवणूक, खंडणीचे गुन्हा दाखल असलेल्यांना बरोबर घेतल्याने चळवळ बदनाम होऊ शकते ही हिताची गोष्ट मी सरोदे यांना सांगितली होती. मात्र त्यांना ते पटले नाही. निवडणुकीमध्ये मी काय करावे, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, असे ॲड. निंबाळकर म्हणाले.


