थोडी जरी लाज असेल तर आमदार केसरकर यांनी त्वरित राजीनामा द्यावा …. उबाठा शिवसेनेचे रुपेश राऊळ
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सुसंस्कृत जिल्हा म्हणून नावलौकिक असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला काळिमा फासण्याचे काम आमदार केसरकर यांनी केले आहे. सावंतवाडीच्या मतदारांसाठी आणि जनतेसाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. जनतेने त्यांना विकासाची संधी दिली होती मात्र, त्यांनी मतदारसंघात उद्योग-व्यवसाय आणण्याऐवजी भोंदू बाबाकडे जाऊन स्वतःचे आरोग्य तपासण्याला आणि स्वतःचा विकास करून घेण्याला प्राधान्य दिले आहे. केसरकर हे भोंदू बाबा अशोक खरात याचे भक्त आहेत, अशी टीका उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज सोमवारी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
केसरकर यांनी केवळ आपला राजकीय स्वार्थ जोपासत सावंतवाडीचा नावलौकिक धुळीस मिळवला आहे. त्यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. या संपूर्ण प्रकरणाची आणि दीपक केसरकर यांच्या भूमिकची सखोल चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात मंगळवारी प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार पाठविली जाणार आहे. असे रुपेश राऊळ म्हणाले.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून येथे अशोक खरात सारख्या भोंदू बाबाने महिलांवर अत्याचार करून धुमाकूळ घातला आहे. ज्या लोकप्रतिनिधींकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राचे हित अपेक्षित होते, तेच लोक जर अशा भोंदू बाबांच्या आहारी जात असतील तर ही राज्यासाठी नाचक्की आहे. आमदार, खासदार आणि मंत्री जनतेला विकासाच्या गोष्टी सांगतात, मात्र स्वतःचे आयुष्य अशा भोंदू बाबांकडून घडवतात, मग हे लोक महाराष्ट्राचा काय विकास करणार? असा सवाल हि श्री. राऊळ यांनी केला.यावेळी चंद्रकांत कासार आणि रमेश गावकर उपस्थित होते.


