कवी दीपक पटेकर यांच्या “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी तर्फे कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर यांच्या “बकुळीची फुले” ह्या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वा. केशवसुत कट्टा, सावंतवाडी येथे आयोजित केला आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यापीठ सिनेटचे माजी सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे, कोल्हापूर (आजरा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य), तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मालवणी कवी विनय सौदागर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी कोमसापचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.जी. ए. बुवा, साहित्यिका सौ.उषा परब, यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कवी दीपक पटेकर यांचा विविध वृत्तातील ६० वृत्तबद्ध कवितांचा समावेश असलेला बकुळीची फुले हा पहिलाच काव्यसंग्रह आहे. अनेक वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंकातून त्यांच्या कविता, ललित लेख, सामाजिक विषयावरील लेख, कथा प्रसिद्ध झाल्या असून त्यांनी आतापर्यंत पाचशेहून जास्त मराठी, हिंदी कविता आणि शंभरहून जास्त ललित लेख, कथा, सामाजिक लेख लिहिले आहेत. गेली पाच वर्षे संवाद दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक म्हणून ते संपादन करत आहेत. अलीकडेच सातारा येथे पार पडलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्ट्यावर त्यांनी कविता सादर केली होती. अनेक राज्यस्तरीय काव्य संमेलनात देखील त्यांचा सहभाग असतो.
या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास सर्व साहित्य रसिकांनी, मित्रमंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन कवी दीपक पटेकर यांच्यासह कोमसाप शाखा सावंतवाडीचे सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव विनायक गावस, कोषाध्यक्ष डॉक्टर दीपक तुपकर, सदस्य ॲड. नकुल पार्सेकर, भरत गावडे, विठ्ठल कदम, प्रा. रुपेश पाटील व कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.


