अशोक खरातचा एकेक कारनामा उघड.. आज नाशिक न्यायालयात हजर करणार
नाशिक|
भोंदू खरात महिलांना माइंड रीडिंगमध्ये तरबेज असल्याचा दावा करत असल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले. महिलांना लक्ष्य करत मानसशास्त्रीय पद्धतीने तो विश्वास संपादन करत होता.तू दिसायला सुंदर आहेस… तुझा पती तुला समजून घेत नाही… तुझी क्षमता कोणी ओळखत नाही… अशा स्तुतीपर बोलांनी तो महिलांना भुरळ घालत असल्याचा आरोप आहे. आशीर्वादाच्या नावे ऊर्जा हस्तांतरण अध्यात्मिक उपचाराच्या नावाखाली महिलांचं संमोहन करायचा.
मी देवाचा अवतार, तुम्ही खास आहात…भावनिक जाळं विणून महिलांचा विश्वास संपादन केलं, अशी चौकशीत अशोक खरातने कबुली दिल्याची माहिती उघड झाली. पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या भावना ओळखून त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न भोंदूबाबा करत होता. तर आतापर्यंत त्याने किती महिलांचे शोषण केले? हे भोंदू खरातला सांगता येईना अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्या पोलिस खरातची कसून चौकशी करत आहे.
दरम्यान, भोंदू अशोक खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अशोक खरातची आज पोलिस कोठडी संपत असल्यानं न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आतापर्यंत अशोक खरातवर लैंगिक छळ आणि फसवणुकीचे १० गुन्हे दाखल झाले आहेत. १० पैकी ८ गुन्हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे तर २ गुन्हे फसवणुकीचे आहेत. नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी SIT कडून खरातला पुन्हा पोलिस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे. आज नाशिक जिल्हा न्यायालय काय निर्णय देतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”


