भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाला २० हजाराची लाच घेताना पकडले
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडी तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाने काम करून देण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) याप्रकरणी सापळा रचून कारवाई केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मालमत्तेच्या पोटहिस्सा मोजणीचे काम पूर्ण करून देण्यासाठी सावंतवाडी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक ओमकार सुरेंद्र आपटे (वय ३३) यांनी तब्बल २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी एसीबीने सापळा रचला. या कारवाईदरम्यान संबंधित भूमापकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक दीपक माळी करीत आहेत.


