दशावतार ही समाजप्रबोधनाची कला असूनही राजाश्रय नाही, दादा राणे यांची खंत
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
दशावतार कलावंत चेहऱ्याला रंग लावतो आणि त्याच्या जीभेवर सरस्वती नांदते. मात्र, आज पुरस्कार स्वीकारल्यानंतर काय बोलावे यासाठी शब्द सुचत नाही. दशावतार कलावंताला लोकांचे आशीर्वाद मिळतात. दशावतार ही समाजप्रबोधन करणारी कला असूनही त्याला राजाश्रय नाही ही खंत दशावतारी कलावंत श्री. दादा राणे कोनस्कर यांनी व्यक्त केली.
श्रीराम वाचन मंदिर आणि ॲड. दीपक नेवगी कुटुंबियांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी आयोजित श्रीराम वाचन मंदिरच्या १७५ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात श्री. दादा कोनस्कर बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात ॲड. दीपक नेवगी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर व्याख्याते अभिनेते नंदू पाटील, दीपक नेवगी पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती दादा राणे कोनस्कर, संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, ॲड. पी. डी. देसाई, सचिव रमेश बोंद्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे
अभिनेते नंदू पाटील व प्रसाद पावसकर यांच्या हस्ते यावेळी दादा राणे कोनस्कर यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन ॲड. दीपक नेवगी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री दादा कोनस्कर पुढे म्हणाले, फार मोठा लोकाश्रय या कलेला आहे. दशावतार कलेत माझी चौथी पिढी, दशावतार सादरीकरणात खूप आनंद मिळतो. दशावतारच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे भाग्य मला लाभले हे मी माझे नशीब समजतो. आज श्रीराम वाचन मंदिरने केलेला आणि माझ्या जन्मभूमीत मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी लाखमोलाचा आहे असे श्री. कोनस्कर म्हणाले.
यावेळी अभिनेते नंदू पाटील म्हणाले, वाचनालय विद्येचे मंदिर आहे, देवाच्या मंदिराला सरकार निधी देते पण, सरस्वतीच्या मंदिराचा निधी गोठवून ठेवते हे दुर्भाग्य आहे. दशावतार सादर करणे अत्यंत कठीण, त्याला स्क्रिप्ट नसते, स्क्रिप्ट डोक्यात असते. त्यामुळे दशावतार कलाकारांपुढे नतमस्तक होतो. व्यापारापासून राजकारणात सगळीकडे आज प्रत्येकजण अभिनय करताना दिसून येतो. राजकारणी तर सर्वोत्तम अभिनेते असतात.
इथल्या पारितोषिकांमध्ये अडकू नका, कामे करा आणि पुढे जा असा संदेश श्री पाटील यांनी यावेळी कलाकार, साहित्यिकांना दिला. मराठी कलाकारांच्या नादी कोणी लागत नाही कारण, मराठी सिने कलाकार शिस्तबद्ध असतो, तो एकाच सीन मध्ये शॉट ओके करतो असे श्री. पाटील म्हणाले.
या कार्यक्रमाला प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. जी.ए. बुवा, अभय नेवगी, दीपक पटेकर, मधुकर मातोंडकर, विठ्ठल कदम, डॉ. विनया बाड, वंदना करंबेळकर, तानाजी वाडकर, मोहन जाधव, सखी पवार, अभय परुळेकर, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, डॉ.चिंडक पाटील, श्रीम.नेवगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुमेधा नाईक यांनी केले तर आभार कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी मानले.


